प्रतिनिधी/ बेळगाव
पिस्तुलीचा धाक दाखवून सराफी दुकानातील दागिने पळविल्याच्या आरोपावरुन गेल्या आठवडय़ात कॅम्प पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याला अटक करणाऱया पोलीस निरीक्षकासह 11 जणांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून शुक्रवारी कॅम्प पोलीस स्थानकाला टाळे ठोकण्यात आले आहे. गुन्हेगारी प्रकरणात अटकेत असलेल्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस स्थानक सीलडाऊन करण्याची बेळगावातील ही पहिलीच घटना आहे.
29 जून रोजी संत ज्ञानेश्वरनगर, मजगाव येथील एका 29 वषीय तरुणाला अटक करण्यात आली होती. विजयनगर येथील समृद्धी ज्वेलर्समधून त्याने पळविलेले चार नेकलेस जप्त करण्यात आले होते. त्याच्याजवळून एक मोटारसायकल, एक गावठी पिस्तूल व तीन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती.
शुक्रवारी सकाळी त्या 29 वषीय तरुणाचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अटकेची कारवाई पूर्ण करुन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. 29 जून रोजीच त्याचे स्वॅब जमविण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस व कारागृह अधिकाऱयांना धक्का बसला. कॅम्पच्या पोलीस निरीक्षकांसह गुन्हे तपास विभागात सेवा बजावणाऱया एकूण 11 जणांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी कॅम्प पोलीस स्थानकातील सर्व पोलिसांना घरी पाठविण्यात आले व पोलीस स्थानकाला टाळे ठोकण्यात आले. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डकडून सॅनिटायझेशन करण्यात आले.
किमान तीन दिवस हे पोलीस स्थानक बंद ठेवण्यात येणार आहे. क्वारंटाईनमधील 11 पोलिसांच्या कुटुंबीयांनाही होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. पाच दिवसानंतर त्यांची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. लुटमार प्रकरणातील आरोपीला अटक झाली त्यावेळी गुन्हे तपास विभागाचे डीसीपी यशोदा वंटगोडी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा आदींनी कॅम्प पोलीस स्थानकाला भेट दिली आहे. आता त्यांनाही क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे.
कॅम्प पोलीस स्थानकात अटकेची कारवाई झाली त्यावेळी काही पत्रकार व छायाचित्रकारही तेथे गेले होते. त्यांचीही माहिती मिळविण्यात येत असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. गुन्हेगारी प्रकरणात अटकेत असलेल्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस स्थानक सीलडाऊन करण्याची बेळगावातील ही पहिलीच घटना आहे.
कॅम्प पोलीस स्थानक तात्पुरते हलविले
लुटमार प्रकरणातील आरोपीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कॅम्प पोलीस स्थानकाला टाळे ठोकण्यात आले आहे. सध्या हे पोलीस स्थानक महिला पोलीस स्थानकाच्या शेजारी असलेल्या वन स्टॉप सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षकासह 11 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.









