आपल्या देशात 18 पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तीला रक्तदान करता येते. त्यांचे वजन 45 किलोपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
- रक्तदानासाठी हिमोग्लोबिनची किमान पातळी असणे गरजेचे आहे. यासाठी रक्तदान केंद्रावर चाचणी केली जाते. तसेच रक्तदानाच्या वेळी दाता सुरक्षित आणि तंदुरुस्त आहे की नाही, हे देखील विचारले जाते. आजारी असल्यास त्याचे रक्त घेतले जात नाही. गर्भवती, स्तनदा माता यांना रक्तदान करण्यास परवानगी नाही. एखाद्या तंदुरुस्त व्यक्तीने रक्तदान केल्यास कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. परंतु काहींना रक्त पाहून त्रास होऊ शकतो. अशा वेळी डोळे बंद ठेवणे हिताचे ठरेल.
- थॅलेसिमीया, हीमोफीलिया यासारख्या आजाराने पीडित असलेल्या रुग्णांना नियमित अंतराने रक्ताची गरज भासते.
- याशिवाय अपघात झाल्यानंतर, बाळंतपणाच्या काळात, कोणत्याही प्रकारच्या ब्लिडिंगमध्ये, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये, एप्लास्टिक ऍनिमिया आदींच्या स्थितीत रुग्णांना रक्ताची गरज भासते.
- सर्वसाधारणपणे क्रॉस मॅचिंग करुन एकाच गटातील व्यक्तीला रक्त दिले जाते. जर कोणताच ग्रुप मॅच होत नसेल तर ओ-निगेटिव्ह गटाचा आपत्कालिन स्थितीत वापर केला जातो.
- कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीला रक्तदान कधी करता येते का, याबाबत प्रश्न विचारले जातात. आरटीपीसीआरचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर चौदा दिवसांनी रक्तदान करता येते.
- कोविड प्रतिबंधात्मक कोणतीही लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी संबंधित व्यक्ती रक्त देण्याचा विचार करु शकते. लसचा पहिला आणि दुसरा डोसदरम्यानही रक्तदान करता येते.
- रक्तदान केल्यानंतर चौदा दिवसांच्या आत पॉझिटिव्ह रिपोर्ट येत असेल तर ब्लड डोनेशन कॅम्प प्रशासन किंवा रुग्णालयाला त्याची तात्काळ माहिती देणे गरजेचे आहे.
– डॉ. संतोष काळे