संभाजी भिसे/ नवारस्ता
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण मंगळवारी पहाटे फुल्ल काठोकाठ भरले. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास आता कोणत्याही क्षणी धरणातून पुन्हा पाणी सोडण्याची शक्यता वाढली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाला सुरुवात झाल्याने अवघ्या काही दिवसांतच धरणाच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होऊन पाणीसाठय़ाने ऑगस्ट महिन्यातच नव्वदी ओलांडली. परिणामी संततधार पाऊस आणि धरणात येणारी पाण्याची मोठय़ा प्रमाणात आवक यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे 14 ऑगस्टपासून उघडण्यात आले होते. प्रथम पावणेदोन फूट, नंतर चार, सहा, सात आणि शेवटी दहा फुटांपर्यंत दरवाजे उघडून धरणातून सुमारे 56 हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होता. त्यामुळे पाटण, कराड आणि सांगली परिसरात पुराचा धोकाही निर्माण झाला होता.
मात्र संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्णपणे ओसरल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे आणि पायथा वीजगृह बंद करण्यात आले होते. तरीही पाणलोट क्षेत्रातून येणाऱया पाण्याची आवक सुरुच राहिल्यामुळे धरणातील पाणीसाठय़ाने शंभर टीएमसीचा टप्पा ओलांडून अतिशय धिम्या गतीने धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या म्हणजे 105 टीएमसीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.
अखेर मंगळवारी पहाटे धरणाच्या पाणीसाठय़ाने निर्धारित 105 टीएमसीचा टप्पा गाठला आणि संपूर्ण राज्याला आनंदाची बातमी दिली. मात्र हवामान खात्याने येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने पाणलोट क्षेत्रात पावसाला पुन्हा सुरुवात झाली, तर आता कोणत्याही क्षणी धरणातून पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरू करण्याची शक्यता वाढली आहे.
पुढचे दोन दिवस पावसाचे?
येत्या 48 तासांत राज्यातील मुंबई, ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे आता पुढचे दोन दिवस राज्यात पुन्हा पाऊस बरसण्याची शक्यता वाढली आहे..








