एसटी बंद असल्याने रेल्वे गाड्यांना गर्दी, पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने प्रवाशांचे हाल
प्रतिनिधी / मिरज
एसटी कर्मचाऱ्यांच्या अनिश्चित संपामुळे प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली असून, पुणे-मुंबईकडे जाणारे प्रवासी सैरभैर झाल्याचे पाहायला मिळत आहे. मिरजेतून मुंबईसाठी खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून तब्बल 2500 रुपयांची आकारणी होत असल्याने शेकडो प्रवाशांनी रेल्वे गाड्यांना गर्दी केली. मात्र प्रवाशांच्या तुलनेत रेल्वे गाड्यांचा आरक्षण कोटा पूर्ण झाल्याने अनेक प्रवाशांना तिकीटाविना रेल्वे जंक्शनवर ताटकळत बसावे लागले. सकाळी नऊ वाजता कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस मिरज जंक्शनवर येताच प्रवाशी रेल्वेमध्ये बसले. मात्र यातील बहुतांशी प्रवाशांकडे रेल्वेचे तिकीटही नसल्याचे आढळून आले.
कोल्हापूर-मुंबई असा प्रवास करणारी कोयना एक्सप्रेस मिरज जंक्शनवरच तुडुंब भरली. अनेक प्रवासी रेल्वे बोगीमध्ये मिळेल त्या जागी बसवले होते. तत्पूर्वी कोल्हापूर रेल्वे जंक्शन वरूनच शेकडो प्रवासी या रेल्वेतून आले होते. मिरज जंक्शनवर प्रवाशांची गर्दी होती. फलाट क्रमांक एकवर कोयना एक्सप्रेस येतात सर्व प्रवासी खचाखच रेल्वे बोगीमध्ये शिरू लागले. त्यामुळे बैठक व्यवस्थेच्या कारणातून प्रवाशांमध्ये वादावादीचे घटनाही घडल्या.
बंद असलेली एसटी सेवा, खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी लूटमार, आणि पर्यायी प्रवासी वाहने उपलब्ध नसल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा रेल्वे गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून मिरज-पुणे, मिरज-कोल्हापूर, मिरज-बेळगाव आणि मिरज-सोलापूर मार्गावर सर्व पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत.








