उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्हय़ातील नगलातेजा या गावची लोकसंख्या 915 इतकी आहे. मात्र या गावात कोरोनाचा एकही रुग्ण आतापर्यंत आढळलेला नाही. या गावातील जवळपास 100 लोक दुसऱया जिल्हय़ांमध्ये किंवा राज्यांमध्ये कामासाठी आहेत. या सर्व लोकांना, ते त्या गावचेच असूनही कोरोना संपेपर्यंत गावात येण्याला बंदी घालण्यात आली आहे. शिवाय गावात कोरोनासंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते. त्यामुळे हे गाव कोरोनामुक्त राहिले आहे.
कोरोना मुक्त राहण्यासाठी या गावाला कोणतेही सरकारी साहाय्य मिळालेले नाही. गावात आरोग्य सुविधाही म्हणावा तशा नाहीत. साध्या आजारांवर उपचार करण्यासाठीही तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. तरीही या गावात कोरोना प्रवेश करू शकलेला नाही. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला गावात प्रवेश करण्यास घातलेली बंदी हे या कोरोनामुक्तीचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते.
या प्रमाणे गावाबाहेरील व्य़क्तींना गावबंदी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गावातील लोकही बाहेर जाऊ शकत नाहीत. गावातल्या लोकांना ज्या वस्तूंची आवश्यकता असते त्या आणण्यासाठी केवळ एक-दोन माणसांनाच पाठविले जाते. व अत्यंत सुरक्षितपणे त्या वस्तूंची खरेदी करून नंतर त्या गावात विकल्या जातात. अशी काटेकोर दक्षता या गावाने गेल्या मार्चपासून घेतली आहे.









