कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही निसर्गसंपन्न जिल्हे आहेत. सिंधुदुर्ग तर देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. दोन्ही जिल्हय़ांत पर्यटन विकासाला फार मोठी संधी आहे. मागील काही वर्षांत पर्यटकही वाढू लागले आहेत. मात्र तरीही पर्यटन विकासात आपल्याला मोठी झेप घेता आलेली नाही. कोकण दौऱयावर येऊन गेलेले राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी निसर्ग जपून शाश्वत पर्यटन विकास करणार, असे सांगितले आहे. पर्यटन विकासाच्या अनेक संकल्पनाही त्यांनी मांडल्या आहेत.
कोकणातील सिंधुदुर्ग किनारी तारकर्ली येथे अत्याधुनिक स्कूबा बोटीचे लोकार्पण राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या दौऱयाच्या निमित्ताने पर्यटन विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होऊ शकते. कोकणात रोजगार निर्मिती झाली पाहिजे. उद्योग आले पाहिजेत. पण त्यामुळे कोकणच्या निसर्ग सौंदर्यामध्ये कोणतीही बाधा येता नये. कोकण हा निसर्ग संपन्न आहे. विकास करताना त्याचे सौंदर्य कोठेही कमी होऊ देणार नाही, असे पर्यटन मंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे निश्चितच पर्यटनाला दिशा मिळू शकते.
कोकणच्या पर्यटन विकासासाठी येथे कृषी व मान्सून पर्यटन विकसित करणे, तारकर्ली, मालवण, देवबाग येथे मोठय़ा संख्येने होम-स्टे आहेत. त्यांच्या विकासासाठी धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे पर्यटन धोरणात काही बदल झाल्यास निश्चितच कोकणात पर्यटन वाढीला त्याचा मोठा फायदा होणार आहे. गोव्याने ज्याप्रमाणे पर्यटन विकासाला गती दिली, त्याप्रमाणे कोकणातही पर्यटन विकास होणे आवश्यक आहे. किनारपट्टी भागात होम-स्टेबाबत धोरण ठरविताना सीआरझेडचे उल्लंघन होणार नाही. परंतु किनाऱयालगत पर्यटकांच्या सोयीसाठी होम-स्टेच्या सुविधा निर्माण करण्यासाठी परवानगी दिली, तर पर्यटनाला अधिक चालना मिळू शकते.
‘बीच शॅक’ची पॉलिसी राबविली जात आहे. परंतु, त्यालाही गती आलेली नाही. ‘बीच शॅक’ निर्माण करून त्या ठिकाणी पर्यटकांना आवश्यक सुविधा दिल्या पाहिजेत. कोकणच्या किनारपट्टीवर कोरोनाचा काळ वगळता इतर वेळी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. कोकणातील स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. त्यामुळे देशी पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकही कोकण किनारपट्टीवर येऊ लागले आहेत. विस्तीर्ण असे स्वच्छ समुद्र किनारे, फेसाळणाऱया लाटा कोकण किनारपट्टीवरच पाहायला मिळतात. त्यासाठी पर्यटकांना किनाऱयापर्यंत येण्याकरिता पायाभूत सोयी, सुविधा निर्माण करायला हव्यात.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांतर्गत मालवण, तारकर्ली येथे समुद्रतळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी जिल्हय़ात पाँडिचेरीहून आणण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ‘आरमार’ बोटीचे पर्यटनमंत्र्यांनी उद्घाटन केले. त्यामुळे कोकणात आता स्कुबा डायव्हिंगला चालना मिळू शकते. इन्स्टिटय़ूट ऑफ स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षणाला वाव मिळणार आहे.
पर्यटनमंत्र्यांनी कोकणच्या पर्यटन विकासाबाबत अनेक संकल्पना मांडल्या आणि पुढील दोन वर्षांत पर्यटन क्षेत्रात फार बदल दिसून येतील, असे सांगितले. यामध्ये कोकणातील निसर्गरम्यतेला धक्का न लावता कृषी पर्यटनाला वाव दिला जाणार आहे. ‘होम-स्टे’च्या धोरणात बदल करून छोटे-मोठे ‘होम-स्टे’ वाढविले जाणार आहेत. दोन-तीन पंचतारांकित हॉटेल्स आणली जाणार आहेत. त्यामधून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. धार्मिक पर्यटन स्थळे विकसित करणे, मंदिरांचा अध्यात्मिक पर्यटन विकास, कासव संवर्धन करून किनारपट्टीवर ‘बीच शॅक’ धोरण आणले जाणार आहे. नौकेबरोबरच सबमरीनचा प्रस्ताव आला आहे. हाऊस बोट, बॅक वॉटर यावर विचार सुरू असून निसर्गाला धक्का न पोहोचता कोकणला शोभेल, असा पर्यटन विकास करण्याचा मानस पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून कागदावरच राहिल्याची टीका होत आहे. मात्र येत्या दोन वर्षांत पर्यटन विकासाला चालना देऊन पर्यटनात वाढ होईल आणि शाश्वत विकास झालेला दिसेल, असे पर्यटनमंत्र्यांनी आपल्या दौऱयात म्हटले आहे. पर्यटनमंत्र्यांच्या या संकल्पना अमलात आल्यास पर्यटनदृष्टय़ा आमुलाग्र बदल होऊन जाईल. पर्यटन व्यवसाय हाच कोकणची अर्थव्यवस्था बळकट करेल. पर्यटनमंत्र्यांचा दौरा फलदायी ठरला असेल, असेही म्हणता येईल.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात अनेक पर्यटन स्थळे आहेत. तारकर्ली आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून गणले गेले आहे. त्याशिवाय भोगवे बीच, रत्नागिरीतील भाटये बीच, सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ला, रत्नदुर्ग, थिबा पॅलेस, सावंतवाडीचा राजवाडा, गड किल्ले, मंदिरे, अंाबोलीसारखे थंड हवेचे ठिकाण अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत आणि ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक आले पाहिजेत, तर सर्वप्रथम पायाभूत सुविधा निर्माण व्हायला हव्यात. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. चिपी विमानतळही झाले आहे. त्यामुळे कोकणात देशी-विदेशी पर्यटक येऊ शकतात. परंतु, पर्यटन स्थळांकडे जाणारे अंतर्गत रस्ते उत्तम दर्जाचे व्हायला हवेत. पर्यटन स्थळावर स्वच्छतागृह, चेंजिंग रुम, राहण्याची व्यवस्था यासारख्या पायाभूत सुविधा निर्माण करायला हव्यात. तरच पर्यटन विकासात झेप घेता येईल.
पर्यटन मंत्र्यांनी पंचतारांकित हॉटेल्स कोकणात आणणार, असे म्हटले आहे. परंतु, सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊन 25 वर्षे झाली, तरी शिरोडा वेळागर येथे होऊ घातलेले ताज ग्रुपचे पंचतारांकित हॉटेल आजही होऊ शकलेले नाही. त्याबाबत स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन स्थानिकांचे प्रश्न सोडवले असते, तर यापूर्वीच पंचतारांकित हॉटेल झाले असते. कोकणात कृषी पर्यटनालाही फार मोठी संधी आहे. दोन्ही जिल्हय़ांत मोठय़ा प्रमाणात फळबागा आहेत व शेती सुद्धा चांगल्या पद्धतीने केली जाते. काही शेतकऱयांनी स्वतःहून पुढे येत कृषी पर्यटन केंद्रे सुरू केली आहेत. शहरातून आलेले पर्यटक या कृषी पर्यटनाला पसंती देतात.
मालवण-तोंडवळी येथे सी-वर्ल्ड प्रकल्प होऊ घातला होता. शंभर कोटीची तरतूदही करण्यात आली होती. परंतु, या प्रकल्पावर राजकारणाच अधिक झाले. सी-वर्ल्ड प्रकल्प होण्यासाठी स्थानिकांचे काय प्रश्न आहेत, हे समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे सी-वर्ल्डसारखे पर्यटन विकास प्रकल्प फक्त चर्चेतच राहिले. कोकणात मोठे उद्योग शक्य नसतील, तर किमान पर्यटनावर आधारित उद्योग व्यवसाय व्हायलाच हवेत. तरच पर्यटनाला चालना मिळणार आहे.
पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे यांनी आरमार पर्यटन डायव्हींग बोट लोकार्पणाच्या निमित्ताने बोलताना कोकणच्या पर्यटन विकासाबाबत अनेक संकल्पना बोलून दाखविल्या आणि दोन वर्षांत पर्यटन विकासात बदल झालेला दिसेल, असेही सांगितले. पर्यटन मंत्र्यांच्या संकल्पना अमलात येवो आणि त्यांचा दौरा कोकणच्या पर्यटनासाठी फलदायी ठरो, हीच अपेक्षा.
संदीप गावडे








