प्रवीण जाधव/ रत्नागिरी
जागतिक तापमान वाढीचा प्रतिकूल परिणाम पर्यावरणावर होताना दिसून येत आह़े हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढल्याने 2006-18 दरम्यान मुंबईसह कोकणातील समुद्राच्या पातळीमध्ये 3.3 मिलीमिटरने वाढ झाली आह़े यामुळे भविष्यात कोकण किनारपट्टीवर राहणाऱया वस्त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आह़े असा अहवाल राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी नुकताच विधानसभेत सादर केल़ा
महाराष्ट्रात सातत्याने होणारी अतिवृष्टी व जागतिक तापमानवाढ ही प्रमुख कारणे समुद्राची पाणी पातळी वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. तसेच 2050 पर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी शहरांमध्ये पुरस्थिती येवू शकत़े महाबळेश्वर येथे नुकतेच एकाच दिवशी 750 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होत़ी यामुळे रत्नागिरी जिल्हय़ातील चिपळूण शहरात पूर आला होत़ा हे सर्व बदलत्या हवामानाचे परिणाम आहेत़ भविष्यात अशा घटना थांबवण्यासाठी पर्यावरण रक्षणासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आह़े
मनीषा म्हैसकर यांनी सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षांत 31 जिह्यांमध्ये अतिवृष्टीच्या सुमारे 175 घटना आणि 36 जिह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सुमारे 189 घटना घडल्य़ा तसेच अतिवृष्टीच्या घटनांमध्ये 80 पर्यंत वाढ झाली आहे. यामध्ये मुंबई व कोकण विभागातील जिह्यांना महत्व आहे. पूर, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ व गारपीट, भूस्खलन इत्यादी घटनांमुळे उद्भवलेल्या आपत्तींच्या वेळी राज्याने 21,000 कोटींहून अधिक नुकसान भरपाई आणि मसुदा मदतकार्ये खर्च केली आहेत.
मुंबई शहर हे उष्णतेचे बेट बनले आहे. याला जबाबदार वाढते काँक्रिटीकरण, पाणथळ जमिनींचा नाश, खारफुटीचा ऱहास आणि हिरवळ कमी होणे आदी आहेत़ तर पुणे शहरातील कोथरूड, हडपसर, औंध व विमान नगर यांसारखे भाग उष्णतेचे बेट झाले आहेत़ 1991-2018 दरम्यान मुंबईच्या मोठय़ा भागांनी तापमानात अंदाजे 2 अंश सेल्सिअसची वाढ अनुभवली आहे तर पुण्याच्या काही भागांमध्ये 2001-2016 दरम्यान तापमानात सुमारे 3 अंश सेल्सिअस वाढ झाली आहे, असे अहवालात नमूद केले आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे मानवी उत्पादन क्षमतेत घट झाल्यामुळे कामाचे तास कमी झाल्याने अर्थव्यवस्थेला व सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आह़े पीक उत्पादकता कमी होणे, पीक जाळण्याच्या वाढत्या घटना, कीटकांचे आक्रमण आणि कमी दुग्ध उत्पादन हे परिणाम असू शकतात, असा इशारा या अहवालातून देण्यात आला आह़े
तातडीने उपाययोजना करण्याची गरज
कोकणाला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आह़े या किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणावर लोकवस्ती आह़े तसेच येथे राहणाऱया लोकांची प्रमुख उपजीविका ही समुद्रावर अवलंबून आह़े अशा परिस्थितीत समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास मोठा फटका कोकणाला बसण्याची शक्यता आह़े त्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आह़े









