आसामी कथाकार नीलमणि फूकन यांनाही प्रतिष्ठेचा पुरस्कार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2021 अन् 2022 च्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी साहित्यिक नीलमणि फूकन यांचे नाव जाहीर झाले आहे. तर पुढील वर्षाचा म्हणजेच 2022 चा ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना देण्यात येणार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने 56 व्या आणि 57 व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा केली आहे. पुरस्कारादाखल 11 लाख रुपये रोख, वाग्देवीची कांस्याची मूर्ती आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते.
प्रसिद्ध कादंबरीकार आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिका प्रतिभा राय यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत निवड समितीचे अन्य सदस्य माधव कौशिक, सैय्यद मोहम्मद अशरफ, प्रा. हरीश त्रिवेदी, सुरंजन दास, पुरुषोत्तम बिलमाले, चंद्रकांत पाटील, डॉ. एस. मणिवालन, प्रभा वर्मा, असगर वजाहत आणि मधुसुन आनंद सामील होते.
आसामी साहित्यिक
नीलमणि फूकन प्रसिद्ध आसामी लेखक, कवी आणि स्वातंत्र्यसेनानी होते. आसामच्या गोलघाट जिल्हय़ात 10 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या फूकन यांनी 13 काव्यसंग्रह लिहिले आहेत. सूर्य हेनो नामि अहे एई नादियेदी, मानस-प्रतिभा, फुली ठका, सूर्यमुखी फुल्तोर फाले इत्यादी त्यांच्या महत्त्वाच्या साहित्यकृती आहेत. पद्मश्रीने सन्मानित फूकन यांना साहित्य अकॅडमी पुरस्कार (1981) , आसाम व्हॅली अवॉर्ड (1997), साहित्य अकॅडमी फेलोशिप (2002) इत्यादींनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या साहित्याचा अनेक भारतीय तसेच विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.
कोकणी लेखक
2022 साठी 57 वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रख्यात कोकणी लेखक दामोदर मावजो यांना प्रदान करण्यात येणार आहे. दामोदर मावजो हे गोव्यातील कादंबरीकार, कथालेखक आणि निबंधकार आहेत. त्यांच्या ‘कार्मेलिन’ या कादंबरीसाठी त्यांना 1983 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने (कोकणी) सन्मानित करण्यात आले आहे. दामोदर मावजो यांचा जन्म 1 ऑगस्ट 1944 रोजी झाला होता. त्यांच्या आतापर्यंत 4 कथासंग्रह प्रकाशित झाल्या आहेत. समकालीन कोकणी साहित्यातील ते दिग्गज चेहरे आहेत. सुमारे 50 वर्षांच्या साहित्यप्रवासात त्यांनी कथा, कादंबऱया आणि बालसाहित्य निर्मिले आहे. मावजो यांच्या साहित्यात मानवी संबंध, सामाजिक बदल, जातीयवाद इत्यादी मुद्दे प्रामुख्याने हाताळण्यात आले आहेत. अंगवान, खिल्ली, कार्मेलिन, सूद, गोयेम्बाव आणि सुनामी सिनमो इत्यादी त्यांच्या साहित्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. मावजो यांना साहित्य अकादमी पुरस्कार, गोवा कला अकॅडमी साहित्य पुरस्कार, कोकणी भाषा मंडळ पुरस्कार इत्यादींनी गौरविण्यात आले आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार
भारतीय ज्ञानपीठ न्यासाकडून भारतीय साहित्यासाठी देण्यात येणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. 1965 मध्ये एक लाख रुपयांच्या पुरस्कार रकमेतून प्रारंभ झालेल्या या पुरस्काराला 2005 मध्ये गौरवनिधी 7 लाख रुपये करण्यात आला. सध्या हा गौरवनिधी 11 लाख रुपयांचा झाला आहे. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार 1965 मध्ये मल्याळी लेखक जी. शंकर कुरुप यांना प्रदान करण्यात आला होता. 1982 पर्यंत हा पुरस्कार लेखकाच्या एका साहित्यकृतीसाठी देण्यात येत होता. पण त्यानंतर लेखकाच्या भारतीय साहित्यातील संपूर्ण योगदानासाठी पुरस्कार दिला जाऊ लागला.









