मुंबईत जीव नकोसा झाल्याने गावाकडे लोटणारे चाकरमान्यांचे लोंढे केवळ कोकणवासियांचीच नव्हे तर प्रशासनाचीही डोपेदुखी ठरली आहे. दोन महिन्यांपूर्वी दुबईकडे भीतीने पाहणारे आता मुंबईकडे त्याच नरजेने पाहू लागले आहेत.
मे महिना आणि कोकण यांचे एक अनोखे नाते आहे. गावाकडे जाऊन आंबा-काजूसह कोकणी आदरातिथ्याचा अनुभव घेण्यासाठी आसुसलेले चाकरमानी आणि मुला-बाळांनी घर भरून जाईल, सारे घर गावच्या मातीत रमेल या जाणीवेने डोळे लावून बसलेले गावकरी.. हे कोकणातील दरवर्षीचे चित्र. यंदा मात्र हाच मे महिना आणि हेच चाकरमानी गावाला नकोसे झाले आहेत. मे महिना उजाडताच चाकरमान्यांच्या माध्यमातून कोकणात झालेला कोरोनाचा उद्रेक हे त्याचे कारण ठरले आहे. मुंबईत जीव नकोसा झाल्याने गावाकडे लोटणारे हे लोंढे केवळ कोकणवासियांचीच नव्हे तर प्रशासनाचीही डोपेदुखी ठरली आहे. दोन महिन्यांपूर्वी दुबईकडे भीतीने पाहणारे आता मुंबईकडे त्याच नरजेने पाहू लागले आहेत.
मार्च महिन्याच्या उत्तरार्धात भारतामध्ये कोरोनाचे पडघम वाजू लागले. देशात सुरू झालेले लॉकडाऊन आणि परदेशातून आलेल्या लोकांमध्ये आढळणारा कोरोना संसर्ग हा पहिला टप्पा भारतीयांनी फारसा मनावर घेतला नव्हता. आजाराचे नाविन्य आणि अचानकपणे मिळालेली सुट्टी एन्जॉय करण्याकडेच पहिल्या टप्प्यात अनेकांचा कल होता. एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात संसर्गाचे लोकल ट्रान्समिशन दिसू लागल्यावर आणि प्रसारमाध्यमांतील अपडेट्सवरून बहुतेकांना या संसर्गाचे गांभीर्य जाणवू लागले. लॉकडाऊनचे, थांबलेल्या उत्पन्नाचे, बंद व्यवसायाचे, भरकटलेल्या शिक्षणव्यवस्थेचे चटके जाणवायला लागेपर्यंत मे महिना दाखल झाला होता. या मे महिन्याला मात्र ना चाकरमान्यांची ओढ ना पाहुणचाराचा स्वाद… आहे ती एक अनामिक भीती कोरोना संसर्गाची……!
एप्रिल महिन्याच्या अखेरीला चाकरमान्यांना कोकणात आणण्याच्या मुद्याने डोके वर काढले. आपणच चाकरमान्यांचे तारणहार असल्याचे दाखवण्याचा राजकीय आटापिटा सुरू झाला. मात्र बहुतांश गावांनी योग्य तपासणी व संस्थात्मक क्वारंटाईनच्या प्रक्रियेनंतरच चाकरमान्यांना स्वीकारण्याचा पवित्रा घेतला आणि राजकारणी थोडे बॅकफूटवर गेले. मे महिन्याचे कोरोनाने केलेले स्वागत मात्र कोकणवासियांच्या तोंडचे पाणी पळवणारे आहे.
2 मे पासून कोकणात कोरोनाची स्पेशल ‘चाकरमानी बॅच’ सुरू झाली. मिळेल त्या मार्गाने चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले. चाकरमान्यांना जिह्याच्या सीमेवरच ताब्यात घेऊन क्वारंटाईन करण्यास व स्वॅबची तपासणी करण्यास सुरुवात झाली. या तपासणी अहवालांनी जिल्हावासियांची झोप उडवली आहे. रत्नागिरीत 2 मे पासून मंगळवार सकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांच्या संख्येने अर्धशतक ओलांडले व बळींची संख्याही तीनवर पोचली. सिंधुदुर्गातही कोरोनाग्रस्तांची संख्या पाचवर गेली असून त्यांचे मुंबई कनेक्शन आहे. या जिल्हय़ात चाकरमान्यांचा ओघ अद्याप मर्यादित असल्याने ही संख्या सध्या नियंत्रणात आहे. दरदिवशी वाढत असलेल्या या संख्येने चाकरमान्यांकडे पाहण्याचा कोकणवासियांचा दृष्टिकोन पुरता बदलला आहे.
एप्रिल महिन्यात रत्नागिरी जिह्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये दोन रुग्ण दुबईतून आले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला तर एक बरा होऊन परतला. तिसरा रुग्ण मरकज कनेक्शनचा होता व तोही बरा झाला. रत्नागिरीत आढळलेले उर्वरित एकाच कुटुंबातील 6 महिन्याच्या बालकासह तीन रुग्णही बरे होऊन घरी परतले. सिंधुदुर्ग जिल्हाही याच काळात एकमेव कोरोनाग्रस्त बरा झाल्याने कोरोनामुक्त झाला. या दरम्यानच मुंबई-पुण्यात मात्र कोरोनाचा वेगाने फैलाव होत होता. याच कोरोनाच्या रेड झोनमधून चाकारमानी गावी येण्यासाठी धडपडू लागले. जंगलातून वाट काढत, रेल्वे ट्रक तुडवत तर कधी चेक नाके चुकवत किंवा ‘मॅनेज’ करत चाकरमानी गावाकडे परतू लागले. नेमक्या याचवेळी कोकणातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढू लागला.
चाकरमानी आणण्यासाठी शासन, प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. मात्र त्यांच्या परतण्याचे योग्य नियोजनच झाले नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. किती चाकरमानी आणायचे, ते कसे आणायचे, त्यांची तपासणी व विलगीकरण कसे व कुठे करायचे, त्यांच्या खाण्या-पिण्याची कशी व्यवस्था करायची याबाबत विविध जिल्हे, तालुके, गावे व राज्याचे प्रशासन यांच्यामध्ये समन्वय आवश्यक होता. यासाठी स्थानिक तयारी, क्षमता व नियोजनाचाही विचार अनिवार्य होता. मात्र तसे झालेले दिसत नाही. चाकरमान्यांचे लोंढे सुरू झाले. त्यांना जिह्याच्या सीमेवर ताब्यात घेऊन त्यांचे स्वॅब घेणे व अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन करणे या कामांना सुरुवात झाली. प्रारंभी सारे सुरळीत असल्यासारखे वाटत असतानाच या वाढत्या लेंढय़ांना पुरे पडण्याची जिह्याची पूर्वतयारीच नसल्याचे दिसू लागले. चाकरमान्यांची एका केंद्रातून दुसरीकडे अशी प्रशासकीय फरफट सुरू झाली. स्वॅब देण्यासाठी तासनतास रांगेत, ना खाण्या-पिण्याची चोख व्यवस्था पुढे नेमके काय करायचे याचा पत्ता ना चाकरमान्यांना ना प्रशासनाला…सर्वत्र फक्त सावळा गोंधळ अन अगतिकता! दुकाने सुरू करण्यापासून कोरोनाच्या लढय़ाबाबतच्या विविध निर्णयाबाबत जिल्हा व तालुका पातळीवरील समन्वयाचा अभाव वारंवार स्पष्ट झाला होता. सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱयांनी प्रशासनाची ही अगतिकता मोकळेपणाने मांडली आणि प्रशासनाच्या दाव्यांमधली हवाच काढून घेतल्याने जनता आणखी हवालदिल बनली आहे. जिह्याधिकाऱयांच्या बोलण्यातून ‘गाईडलाईन्स’ आणि ‘प्रोटोकॉल’च्या संभ्रमात जिल्हा असतानाच राज्य आणि जिल्हा यातील समन्वयाच्या मर्यादाही उघड झाल्या आहेत.
रेल्वेची मर्यादित वाहतूक सुरू झाली आहे. जेलमधील उर्वरित कैद्यांपैकीही अनेक कैदी सोडले जाणार आहेत. परराज्यातील श्रमिक परत येऊ लागले आहेत. मुंबई नियंत्रणात ठेवण्यासाठी चाकरमानी गावाकडे पाठवण्याचे प्रमाण वाढणारच आहे. या वाढत्या ताणाचे नियोजन प्रशासनाला करावेच लागणार आहे. सारे काही नागरिकांच्या हवाल्यावर टाकून प्रशासनाला मोकळे होताच येणार नाही. प्रत्यक्ष फील्डवर काम करत असलेल्या आरोग्य कर्मचारी, पोलीस व अन्य कोरोना योद्धय़ांवर जनतेचा विश्वास आजही आहे. प्रशासनाने चाकरमान्यांचा प्रश्न प्रभावीपणे हाताळल्यास हा विश्वास आणि सामान्यांची उमेद कायम राहिल. असे न झाल्यास संभ्रमित जनता रस्त्यावर उतरली तर तो उद्रेक थांबवणे अशक्यप्राय होईल याचे भान शासन, प्रशासन दोघांनाही ठेवावे लागेल.
विश्वेश जोशी








