वृत्तसंस्था/ दुबई
इंग्लंडची महिला फिरकी गोलंदाज सोफी इक्लेस्टोन तसेच न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज देव्हॉन कॉनवे यांची आयसीसीने जून महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे.
भारतीय महिला संघाविरूद्ध इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाज इक्लेस्टोनची कामगिरी दर्जेदार झाली होती. आयसीसीतर्फे पुरूष आणि महिलांच्या विभागात सर्वोत्तम कामगिरी करणाऱया क्रिकेटपटूंची प्रत्येक महिन्यात निवड केली जाते. महिलांच्या विभागात इंग्लंडच्या इक्लेस्टोनने भारताच्या शफाली वर्मा आणि अष्टपैलू स्नेह राणा यांना मागे टाकत जून महिन्यातील आयसीसीचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा बहुमान मिळविला. फेबुवारी महिन्यात इंग्लंडच्या ब्युमाँटने आयसीसीचा सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंचा पुरस्कार मिळविला होता. भारताविरूद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात इक्लेस्टोनने 8 गडी बाद केले होते तर त्यानंतरच् वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात तिने एकूण 6 बळी मिळविले. न्यूझीलंडमध्ये होणाऱया आगामी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडची आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.
न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज देव्हॉन कॉनवेने जून महिन्यातील आयसीसीच्या सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटूचा बहुमान पटकाविला. इंग्लंडविरूद्ध लॉर्ड्स मैदानावर डावखुऱया कॉनवेने कसोटी पदार्पणातच दमदार द्विशतक झळकविले. त्यानंतर त्याने पुढील दोन सामन्यात सलग दोन अर्धशतके नोंदविली. त्यापैकी एक अर्धशतक भारताविरूद्ध झालेल्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामन्यात नोंदविले होते. या पुरस्कारासाठी कॉनवेने न्यूझीलंडच्या जेमिसनला मागे टाकले.









