वृत्तसंस्था/ रिओ डे जेनेरियो
ब्राझिलमध्ये सुरू असलेल्या एटीपी टूरवरील पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत गुरुवारी पावसाच्या अडथळय़ामुळे स्पर्धा आयोजकांना अनेक सामने रद्द करावे लागले. केवळ दोन एकेरी सामने व्यवस्थितपणे पार पडले. मिओमिर केसमानोव्हिक आणि सेरुन्डोलो यांनी मात्र उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.
केसमानोव्हिकने सोनेगोव्हचा 7-5, 6-4 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. सर्बियाच्या केसमानोव्हिकने 2022 च्या टेनिस हंगामात आपल्या कामगिरीत सातत्य राखले असून जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत त्याने चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. अर्जेंटिनाच्या सेरुन्डोलोने रॉबर्टो कारबालेस या स्पेनच्या खेळाडूवर 6-3, 6-2 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. नॉर्वेचा कास्पर रुड याने या स्पर्धेतून शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने त्याच्या जागी कारबालेसला संधी देण्यात आली होती.









