विद्युत खांबातून प्रवाह सुरू झाल्याने भीती, हेस्कॉमने विद्युत पुरवठा खंडित केल्याने समाधान
प्रतिनिधी / बेळगाव
गवळी गल्ली येथील शाळा क्रमांक 11 जवळील विद्युत खांब क्रमांक सीसीबी 30 मधून विद्युत प्रवाह वाहत होता. काही जणांना त्याचा आवाज आला. त्यामुळे तातडीने त्या परिसरातील नागरिकांनी साऱयांनाच सावध केले. महत्त्वाचे म्हणजे या खांबाजवळच शाळा आहे. मात्र, शाळेला सुटी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेची माहिती हेस्कॉमला कळविल्यानंतर तातडीने कर्मचाऱयांनी येऊन या खांबावरील विद्युत पुरवठा खंडित केला. शुक्रवारी दुरुस्ती करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बऱयाच वेळा शॉर्टसर्किटमुळे विद्युत खांबातून प्रवाह वाहतो. त्यावेळी एखाद्याचा स्पर्श झाला तर मोठी दुर्घटना घडू शकते. अशा घटना घडल्या आहेत. गवळी गल्लीतून जनावरांची वर्दळ असते. बऱयाच वेळा गवळी बांधव खांबालाही आपली जनावरे बांधतात. मात्र, सुदैवाने विद्युत खांबातून प्रवाह वाहत असल्याचे समजल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.