प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात लॉकडाऊन असतानाही वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणावर होत आहे. यावर निर्बंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी कडक अंमलबजावणीचे आदेश काढले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच्या वाहनांना मुभा देताना अन्य गाडय़ांवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत.
शासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी निर्देशांमध्ये सकाळी 7 ते 11 या वेळेत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र या वेळेत रत्नागिरी व चिपळूण नगरपालिका हद्दीतील बाजारपेठेमध्ये दुचाकी वाहनचालक मोठय़ा प्रमाणावर गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. चिपळूण नगरपालिका हद्दीमध्ये काही दुचाकी वाहनचालक विनाहेल्मेट प्रवास करीत असून मोटार अधिनियम 1988 च्या कलम 129 या कलमाचा भंग करताना आढळून येत आहेत. यासाठी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन रत्नागिरी शहर व चिपळूण शहर येथील बाजारपेठेमध्ये सर्व प्रकारच्या खासगी वाहनांची वाहतूक बंद केली आहे. अत्यावश्यक सेवेतील मालवाहतूक वाहनांना मुभा ठेवण्यात आली आहे. आदेशाच्या पालनासाठी बॅरॅकेटींगची व्यवस्था पोलीस यंत्रणेने करावी. आदेशाचे उल्लंघन करणाऱया व हेल्मेट न वापरणाऱया दुचाकी वाहनचालकांवर मोटारवाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार पोलीस विभाग/उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनी दंडात्मक कारवाई करावी, असे या आदेशात म्हटले आहे.