27603 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, महिलांचे प्रमाण जास्त

वार्ताहर /केपे

केपे मतदारसंघात 83.45 टक्के मतदान नोंद झाले आहे. सर्वांत जास्त मतदान बूथ 46 वर 97.85 टक्के, तर कमी मतदान बूथ 10 वर 68.36 टक्के इतके झाले. 33078 पैकी 27603 मतदारांनी मतदान हक्क बजावला. यंदा केपे मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत कवळेकर, काँग्रेसचे एल्टन डिकॉस्ता, आपचे राऊल पेरेरा, तृणमूलचे कांता गावडे, शिवसेनेचे आलेक्सी फर्नांडिस, आरजीचे विशाल देसाई, राष्ट्रवादीचे ऍलोयसियस डिकॉस्ता हे सात उमेदवार निवडणुकीत उतरलेले असले, तरी खरी लढत ही भाजप व काँगेस पक्षामधेच होणार असल्याचे सुरुवातीपासून मानले जात होते.

शनिवारी सायंकाळी प्रचारकार्य संपल्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारपर्यंत अनेक ठिकाणी पैशांचे वाटप झाल्याचा दावा भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. मात्र रीतसर कुठेच तक्रार नोंद झालेली नाही. तसेच भाजप उमेदवाराला काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडवण्याचा व त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रकार प्रचार संपल्यावर शनिवारी रात्री घडल्याचा दावा झालेला आहे. मात्र कुठेच तक्रार नोंद झालेली नाही. सोमवारी सर्व बुथांवर शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले.
सकाळी 9 पर्यंत 11.30 टक्के, 11 पर्यंत 31 टक्के, दुपारी 1 पर्यंत 50.94 टक्के, सायंकाळी 3 पर्यंत 66.58 टक्के, तर 5 पर्यंत 81.11 टक्के मतदान झाले होते. पुरुषांपेक्षा जास्त मतदान महिला मतदारांकडून झालेले आहे. 14834 महिलांनी, तर 12769 पुरुष मतदारांनी मतदान केलेले आहे.









