वार्ताहर /केपे
केपे बाजारात शनिवारी रात्री 10.30 च्या दरम्यान दोन दुकानांना आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. केपे येथील बाजार क्षेत्रातील गिफ्ट शॉप व बाजूला असलेल्या आणखी एक दुकानाला रात्री अचानक आग लागली. त्यानंतर बाजूला असलेल्या आणखी एक दुकानालाही आग लागली. यात दुकानांतील सर्व वस्तू खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
अंबिका गिफ्ट सेंटर हे भेटवस्तू व इतर सामान असलेले दुकान असून दोन दुकानदारांकडून विविध सामान या दुकानात विकले जात होते. यातील संपूर्ण सामान आगीत जळून गेले. बाजूला असलेल्या आणखी एका दुकानालाही या आगीचा फटका बसल्याने नुकसान झाले आहे. मात्र नेमके किती नुकसान झाले हे अजून कळू शकलेले नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच कुडचडे अग्निशामक दलाची दोन वाहने घटनास्थळी पोहोचली. आग इतकी मोठी होती की, दलाला सुमारे 1 तासापेक्षा जास्त वेळ आग विझविण्यास लागला.









