कर्मचाऱयांची घालमेल; प्रशासनाचे दुर्लक्ष : न्याय देण्याची मागणी, काहींनी चढली न्यायालयाची पायरी
प्रतिनिधी / बेळगाव
केएसआरटीसी कर्मचाऱयांनी सहाव्या वेतन आयोगासाठी संप पुकारला होता. त्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱयांना कामावर हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशानुसार कर्मचारी हजर होण्यासाठी गेले असता केएसआरटीसीचे वरिष्ट कर्मचारी त्यांना कामावर हजर करून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे आम्ही अडचणीत आलो असून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केएसआरटीसी कर्मचाऱयांनी केली आहे.
संप केला म्हणून जाणूनबुजून आम्हाला टार्गेट करण्यात आल्याचा आरोपदेखील या कर्मचाऱयांनी केला आहे. आम्ही कायदेशीर मार्गाने संप केला होता. संप करण्यापूर्वी वरिष्ट अधिकाऱयांसह सरकारकडे वेळोवेळी मागणी करून त्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. मात्र, सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला आंदोलनाचे हत्यार उगारावे लागले. आम्ही आंदोलन केले. मात्र न्यायालयाने आंदोलन मागे घेऊन कामावर हजर रहा, असा आदेश दिला. त्यामुळे आम्ही हजर होण्यासाठी गेलो असता आमच्यावर दंडात्मक कारवाई तसेच बदलीचा बडगा उगारण्यात आला आहे.
लोकशाहीमध्ये आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणे चुकीचे आहे का? असा प्रश्न या कर्मचाऱयांनी उपस्थित केला आहे. काही कर्मचाऱयांना कामावर रुजू करण्यात आले आहे. मात्र, ज्या कर्मचाऱयांनी आंदोलनामध्ये सहभाग दर्शविला त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अनेकांना 50 हजारांपासून अडीच लाखांपर्यंत दंड लावण्यात आला आहे. काही जणांना कामावर हजर व्हायचे असेल तर अधिकाऱयांची सही घेऊन या, असे सांगितले जात आहे. संबंधित अधिकाऱयांकडे गेले असता ते सही करण्यास तयार नाहीत. त्यामुळे आम्ही अडचणीत आलो आहे.
जवळपास 500 हून अधिक जण आम्ही कामावर हजर राहण्यासाठी प्रयत्न करत आहोत. येथेच अधिकारी आहेत, मात्र ते स्वाक्षरी करण्यास तयार नाहीत. सायंकाळी या, सकाळी या असे सांगून टोलवाटोलवी केली जात आहे. आज-उद्या या, असे करत आहेत. राज्यात इतर सर्व ठिकाणी कामगारांना हजर करून घेण्यात आले आहे. मात्र, केवळ बेळगावमध्येच ही परिस्थिती अधिकारी करत आहेत. चिकोडी डेपोमध्ये सर्वांना कामावर रुजू करून घेण्यात आले आहे. मात्र, आम्हाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
वरि÷ अधिकाऱयांचा कानाडोळा येथे आम्हाला जेवण नाही. आम्ही दररोज कामावर हजर करून घ्या म्हणून येत आहे. कर्तव्य बजावण्यासाठी कामावर हजर व्हा, असे सांगितले जात आहे. आम्हाला कामावर घ्यायचे नसेल तर तसे त्यांनी लेखी द्यावे, आम्ही घरी जाण्यास तयार आहे, असेदेखील यावेळी कर्मचाऱयांनी सांगितले. एका सहीसाठी आम्ही पाच दिवस खेटा मारत आहे. मात्र, याकडे वरिष्ट अधिकारी कानाडोळा करत आहेत. यामुळे कर्मचाऱयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत काही कर्मचारी न्यायालयात गेले असून न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला कामावर हजर करून घ्यावे लागेल. मात्र, आम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.









