प्रतिनिधी / बेळगाव
केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजीची ‘आयडिया लॅब’ निर्मितीसाठी निवड झालीआहे.
‘ऍक्टिव्ह आयडिया स्किम’ योजनेंतर्गत ही निवड झाली आहे. राष्ट्रीयस्तरावर एकूण 209 इंजिनिअरिंग
कॉलेजमधून बऱयाच चाचण्यांनंतर 49 इंजिनिअरिंग कॉलेजची या लॅब उभारणीसाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये बेळगाव जिल्हय़ातील शेषगिरी या एकमेव कॉलेजचा समावेश आहे.
यासाठी एआयसीटीई म्हणजेच अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण मंडळातर्फे एकूण 1 कोटी 10 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पुढील काळात नोकरी किंवा स्वयंरोजगार, स्वयंउद्योग सुरू करण्याइतकी क्षमता निर्माण करणे, बिझनेस स्टार्टअप्स सुरू करणे, आधुनिक तंत्रज्ञानाशी शिक्षणाची नाळ जोडणे, आंतरशाखांचा
अभ्यास करण्याची सुविधा मिळवून देणे, कारखाने किंवा उद्योगांना उपयुक्त ठरतील असे प्रकल्प तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा आयडिया लॅबचा उद्देश आहे. निर्मितीक्षम अभ्यासावर भर देणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे हाही या लॅबचा हेतू आहे. या निवडीबद्दल केएलई व्यवस्थापनाने कॉलेजचे अभिनंदन केले आहे.









