प्रतिनिधी/ बेंगळूर
मागील भाजप सरकारवर राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष केंपण्णा यांनी 40 टक्के कमिशनचा आरोप केला होता. आता त्यांनी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकारवरही भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. सिद्धरामय्या सरकारमध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
बेंगळूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. काँग्रेस सरकारमध्येही भ्रष्टाचार होत आहे. या सरकारमध्ये कोणतीही प्रमुख कामे झालेली नाहीत. काँग्रेस पक्ष सत्तेवर येऊन केवळा साडेपाच महिने झाले आहेत. मात्र, विकासकामांची बिले देण्यात गैरव्यवहार होत आहे. कंत्राटदारांची थकीत बिले मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेतली आहे. त्यांनी बिले मंजुरीचे आश्वासन दिले आहे. अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून ज्येष्ठतेच्या आधारे बिले मंजूर करण्याचे आश्वासन आपल्याला त्यांनी दिले आहे, असेही केंपण्णा म्हणाले.









