प्रतिनिधी./बेळगाव
कॅम्प येथील एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने कॅम्प परिसरापासून दोन किलोमीटरचे अंतर बफर झोन म्हणून जिल्हाधिकाऱयांनी घोषित केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी सोमवारी सायंकाळी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. कॅम्पला जाणाऱया अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी चन्नम्मा गणेश मंदिरापाठीमागून एकच मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. वैद्यकीय आणि इतर तातडीच्या सेवांसाठीच या मार्गाचा वापर होणार आहे. इतरांसाठी या मार्गावर निर्बंध घातले गेले आहेत.
सिव्हिल हॉस्पिटलजवळ आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱया वाहनांनाच प्रवेश असून तातडीची सेवा व या वाहनांना वगळता इतर सर्व वाहनांसाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक वस्तू पुरवठा करणाऱया वाहनांना या परिसरात सवलत देण्यात आली आहे. चन्नम्मा सर्कलपासून पिरनवाडीला जाणारी वाहने आरटीओ सर्कलमार्गे किल्ला तलाव, सर्किट हाऊस, जिजामाता चौक, देशपांडे पेट्रोल पंप, पिंपळकट्टा, शनिमंदिर, कपिलेश्वर ओव्हरब्रिज, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवावेस, आरपीडी सर्कल, तिसऱया रेल्वेगेटमार्गे जाण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.









