प्रतिनिधी/ बेळगाव
कॅम्प येथील चौघेही कोरोनामुक्त झाल्याने सोमवारी या चौघांनाही निरोप देण्यात आला. यामुळे कॅम्पवासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता कॅम्प कोरोनामुक्त झाल्याने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता जाहीर करण्यात येईल, अशी आशा कॅम्पवासीय बाळगून होते. मात्र, त्यांना अजूनही आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे. अखेरचा कोरोना रुग्ण आढळून आलेल्या दिवसापासून 28 दिवसानंतरच कॅम्प परिसरातील निर्बंधित क्षेत्र हटविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य खात्याच्यावतीने देण्यात आली आहे. यामुळे पुढील आठवडय़ातच कॅम्प परिसर खुला होणार आहे.
कॅम्प भागात दि. 3 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने बेळगावसह कॅम्प परिसरात एकच खळबळ माजली होती. तेव्हापासूनच आरोग्य खाते आणि प्रशासनाच्यावतीने कॅम्प परिसराला निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आणि कॅम्पकडे जाणारे सर्व मार्ग बॅरिकेड्स घालून रोखण्यात आले. त्यानंतरही कॅम्प परिसरातील आणखी तिघे कोरोना रुग्ण आढळल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या चार झाली. यामुळे या भागातील नियमावलींची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आली. सुमारे महिन्याभरापासून कॅम्प परिसर निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित असून, सोमवार दि. 4 रोजी म्हणजेच महिन्यानंतर सर्व चौघेजण कोरोनामुक्त झाल्याने कॅम्पवासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आता कॅम्प परिसरातील निर्बंध हटविणार अशी चर्चाही सुरू होती. मात्र, आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार कॅम्प भागातील निर्बंध पुढील आठवडय़ात हटविण्यात येणार आहेत. यामुळे कॅम्पवासियांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
कॅम्प भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषणा करण्यात आली. यामुळे येथील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला. सर्व बाजूने बॅरिकेड्स लावून मार्ग बंद करण्यात आल्याने बाहेर पडणे मुश्कील बनले होते. केवळ सकाळी 7 ते 9 या दोन तासांच्या कालावधीत भाजीपाला, दूध, रेशन आणि जीवनावश्यक साहित्य घेण्याची मुभा देण्यात आली होती. बाहेरून येणाऱयांना प्रवेशबंदी असून पोलीस व आरोग्य खात्याच्यावतीने अद्यापही निर्बंध जारी आहेत. यामुळे कॅम्प परिसरातील दुकाने अजूनही बंद आहेत. केवळ ग्लोब थिएटर शेजारील मार्ग सुरू आहे. संचयनी सर्कलपासून कॅम्पमध्ये जाणारा मार्ग, कोंडाप्पा स्ट्रीट, फिश मार्केट यासह अन्य मार्ग अजूनही बंदच ठेवण्यात आले आहेत. यामुळे कॅम्प परिसरात अद्यापही शुकशुकाट जाणवत आहे.









