आपत्कालीन मंत्री जिनिचेव यांनी बर्फाळ पाण्यात घेतली होती उडी
वृत्तसंस्था / मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय आणि आपत्कालीन स्थिती मंत्री येवगेनी जिनचेव्ह यांचा बुधवारी एका दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. जिनिचेव हे आर्क्टिक झोनमध्ये एका प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी एक कॅमेरामॅन पाण्यात घसरून पडला होता. त्याला वाचविण्यासाठी जिनिचेव यांनी पाण्यात उडी घेतली होती. पण दोघांचाही यात मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती पुतीन यांनी स्वतःच्या सहकाऱयाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
55 वर्षीय जिनिचेव यांच्या निधनावर त्यांच्या आपत्कालीन मंत्रालयानेही वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. जिनिचेव स्वतःचे कर्तव्य पार पडताना हुतात्मा झाले. ते आर्क्टिक झोनच्या नोरलिस्कमध्ये एका मिशन ड्रिलमध्ये सामील झाले होते. यात सिव्हिल तसेच मिलिट्री युनिट्स भाग घेतात. याचदरम्यान एका व्यक्तीचा जीव वाचविताना त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
या दुर्घटनेचे अनेक साक्षीदार आहेत, पण ही घटना अत्यंत वेगाने घडल्याने कुणाला विचार करण्याचा किंवा कृती करण्याचा वेळच मिळाला आहे. या कार्यक्रमाचे एक कॅमेरामॅन चित्रण करत होता, अचानक तो उंच ठिकाणावरून घसरून बर्फाळ पाण्यात कोसळला. पाण्यात कोसळताच त्याचे डोकं टोकदार दगडाला आपटले आणि त्याचा मृत्यू झाला. कॅमेरामॅनला वाचविण्यासाठी जिनिचेव यांनी पाण्यात उडी घेतली होती, त्यांचा देखील मृत्यू झाला.
जिनिचेव हे राष्ट्रपती पुतीन यांचे चांगले मित्र देखील होते. 1980 च्या दशकात ते रशियाची गुप्तचर यंत्रणा केजीबीत अधिकारी होते. त्यानंतर त्यांनी पोलीस अधिकारी म्हणून देखील काम केले होते. पुतीन यांच्यावर त्यांचा मोठा भरवसा होता. याचमुळे त्यांना राष्ट्रपतींच्या सुरक्षेशी संबंधित पथकात महत्त्वाची जबाबदारी मिळाली होती.









