कोरोनाच्या प्रकोपामुळे घेण्यात आला निर्णय
वृत्तसंस्था/ माँट्रियल
येत्या जूनमध्ये होणारी कॅनडातील फॉर्मुला वन ग्रां प्रि शर्यत यावर्षी रद्द करण्यात आली असल्याचे वृत्त सीबीसी या स्थानिक रेडिओने दिले आहे. 13 जून रोजी ही शर्यत होणार होती.
कोव्हिड 19 च्या नव्या नमुन्याचा प्रकोप वाढत असल्याने तसेच कोरोना व्हायरसची तिसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी कॅनडा सरकारला संघर्ष करावा लागत असल्याने, ही शर्यत प्रेक्षकांना प्रवेश न देता बंद दरवाजामागे घेणेही जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरणार असल्याचा निष्कर्ष माँट्रियल सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी काढल्याने ती रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे सीबीसीने वृत्तात सांगितले आहे. या शर्यतीसाठी येणारे शेकडो स्टाफ मेंबर्स, क्रू मेंबर्स, ड्रायव्हर्स यांच्यासाठी असणाऱया 14 दिवसांच्या क्वारंटाईनला बगल देऊन खासगी मेडिकल स्टाफवर विसंबून राहत बायोबबलमध्ये शर्यत आयोजित करावी, अशी एफ वन पदाधिकाऱयांची इच्छा होती, असेही सीबीसीने सांगितले आहे.
कॅनडामध्ये प्रवेश करणाऱया विदेशींवर प्रवासाचे अतिशय कडक निर्बंध घालण्यात आले असून बाहेरून येणाऱयांना 14 दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याची सक्ती केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना देशात दाखल झाल्यानंतर तीन दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन होण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. कॅनडात होणाऱया सर्वात मोठय़ा क्रीडाप्रकारांपैकी एफ वन रेसिंग हा एक प्रकार असून कोव्हिडमुळे सलग दुसऱया वर्षी ही शर्यत रद्द करण्यात आली आहे.









