कृष्णाचे नृत्य संपले. धेंडा नाचविल्यानंतर तळी बाहेर आणण्यात आली. ती फळाफुलांनी सजवलेली होती. त्यात सोज्वळ ज्ञानदीप तेवत होता. ती अनुभवाच्या हातात दिली. त्याने वंदन केले व तो म्हणाला – आपल्या कुळदेवता कोणत्या हे लवकर सांगा. मी नाचवता होईन. आधी नवरीच्या पक्षाने सांगावे, नंतर वर पक्षाकडे विचारणा करीन. नवरीकडील कुळदेवता वधूपक्षाने सांगितल्या त्या अशा – मायाराणी व ममता, कल्पना कामाक्षी या माजघरात खेळत आहेत.
वासनादेवी सकळी । बाळा बगळा मुकी मैराळी ।
मारको मेसको कराळी । उच्छिष्ट चांडाळी भाणाची ।
आशा तृष्णा दोघीजणी । आमुच्या कुळी मुळींहूनी ।
निंदादेवी महादारुणी । तिसी सज्जनी कांपिजे ।
मोहमातंग आमुचे कुळी । लोभवेताळ त्याजवळी ।
क्रोध झोटिंग महाबळी । आधीं सळी शुभकार्या ।
जें जें दैवत सांगे पैं गा । तें तें नातळत आणि रंगा ।
न ये त्या वाटा लावी वेगा । नाचवूनि उगा तो राहे ।
वधूपक्षातील लोक पुढे सांगू लागले – वासनादेवी, बाळा, बगळा, मुकी मैराळी, मारको, मेसको, कराळी, उच्छिष्ट चांडाळी या देवता आहेत. आशा व तृष्णा या मूळ कुळदेवता आहेत.
महादारुण निंदादेवी, हिला पाहून सज्जन कापतात. आमच्या कुळात मोहमातंग देव आहे. त्याच्याजवळ लोभ वेताळ आहे. महाबळी क्रोध झोटिंग आहे. हे शुभकार्यात विघ्ने उत्पन्न करून त्रास देतात. जे जे दैवत सांगितले त्याला बोलावले. जे जे दैवत आले त्याला नाचवले, आले नाही त्याला परत पाठवले व अनुभव उगा राहिला.
कृष्णपक्षी अलौकिक । अवघें कुळदैवत एक ।
नाचतां अनुभव कौतुक । पडलें टक सकळिकां । कृष्ण कुलदैवत एक । दुजें नाहीं नाहीं देख ।
एका जनार्दनीं सुख । अति संतोष नाचतां।
वरपक्षातील लोक म्हणाले – आमचे कुळदैवत एकच आहे. तो म्हणजे, भगवान श्रीकृष्ण! ते ऐकून सर्वजण स्तिमित झाले.
अनुभव कौतुकाने नाचू लागला. तो संतोषाने नाचताना पाहून एकनाथ महाराज सुखी झाले.
हातीं दुधातुपाची वाटी । देवकी बैसवूनि पाटी ।
पुढें दिधली भीमकी गोरटी । उदर शिंपी शुद्धमती ।
धन्य धन्य तुमची कुशी । जेथें जन्मले हृषीकेशी ।
म्हणोनि लागली चरणांसी । रुक्मिणीसी निरवित ।
चौघां पुत्रांहूनि आगळी । वाढविली हे वेल्हाळी ।
आतां दिधली तुम्हांजवळीं । कृष्णस्नेहें पाळावी ।
दोघीजणीं मातापितरिं । हातीं धरूनियां नोवरी ।
यादवांचे मांडीवरी । यथानुक्रमें बैसविली ।
गहिंवर न धरवे भीमकासी । प्रेम लोटलें तयासी ।
मिठी घालोनि कृष्णचरणांसी । उकसाबुकसी स्फुंदत ।
लाज सांडोनि शुद्धमती । पाया लागली श्रीपती ।
भीमकी देऊनियां हातीं । वैकुंठपती जोडिला ।
पाहाती नरनारी सकळा । आसवें आलीं त्यांचियां डोळां ।
खंतीं न भीमकबाळा । मायेकडे न पाहेचि ।
Ad. देवदत्त परुळेकर









