सांगली / प्रतिनिधी
स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण नद्यांवर नदीउत्सव साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवात महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्यांचा समावेश करण्यात आला असून सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट असून कृष्णा नदीच्या काठावर 15 ते 25 डिसेंबर या कालावधीत नदी उत्सव सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
नदी उत्सव आयोजन आढावा बैठक जिल्हाधिकारी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मिलींद नाईक, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, उपायुक्त राहूल रोकडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी अतुल पाटील आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, उत्सवांतर्गत 17 व 18 डिसेंबर रोजी सर्व नदी घाटांची स्वच्छता मोहिम घेण्यात यावी. 19 व 20 डिसेंबर रोजी देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. 21 डिसेंबर रोजी निसर्ग व पर्यावरण या संबंधित कार्यक्रम आयोजित करावेत.. 22 व 23 डिसेंबर रोजी भक्ती व अध्यात्मक यावर कार्यक्रम आयोजित करावेत. त्याचबरोबर जलसंपदा विभागाने स्वच्छता उपक्रमांचे आयोजन करावे. नदीच्या किनारी सुरक्षिततेचे नियम पाळून दीपोत्सव आयोजित करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.