ब्रिटनचे रॉजर पेनरोज, जर्मनीचे रेनहार्ड गेन्झेल व अमेरिकेच्या अँड्रिया गेझ यांचा समावेश
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना कृष्णविवरासंबंधीच्या शोधांसाठी जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश ऍकॅडमी ऑफ सायन्सेस यांनी मंगळवारी सांगितले की, ब्रिटनचे रॉजर पेनरोज यांना कृष्णविवरासंबंधी शोधासाठी आणि जर्मनीच्या रेनहार्ड गेन्झेल व अमेरिकेच्या अँड्रिया गेझ यांना आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या ‘सुपरमॅसिव्ह कॉम्पेक्ट ऑब्जेक्ट’’च्या शोधासाठी हा प्रति÷ित पुरस्कार प्राप्त झाला आहे. गेझ या 1901 पासूनच्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळणाऱया केवळ चौथ्या महिला आहेत.
पेनरोज यांनी शोधून काढले की, कृष्णविवराची उत्पत्ती ही सापेक्षताच्या सिद्धांताचा एक मजबूत पुरावा आहे. त्याचवेळी गेंझेल आणि गेझ यांनी आपल्या आकाशगंगेच्या केंद्रभागी काही तरी आश्चर्यकारक घडताना टिपले. त्यात बरेच तारे अशा गोष्टींच्या भोवती फिरत होते जे त्यांनी अद्याप पाहिले नव्हते. ते सामान्य कृष्णविवर नव्हते, तर सूर्यापेक्षा 40 दशलक्ष पटीने मोठे महाकाय कृष्णविवर होते. यामुळे सर्व आकाशगंगांमध्ये अशी महाकाय कृष्णविवरे आहेत हे आता शास्त्रज्ञांना माहीत झाले आहे.
अकादमीचे सरचिटणीस गोरन के. हॅन्सन यांनी सांगितल्यानुसार, भौतिकशास्त्राच्या क्षेत्रातील या वर्षाच्या अर्धा पुरस्कार कृष्णविवराची उत्पत्ती आणि सापेक्षता सिद्धांत यासंबंधीच्या शोधासाठी पेनरोज यांच्याकडे जाईल, तर उर्वरित अर्धा गेंझेल आणि गेझ यांच्याकडे जाईल. या नोबेल पुरस्काराचे स्वरूप सुवर्ण पदक, 1 कोटी स्वीडिश क्रोना (11 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त) असे आहे. रसायनशास्त्र, साहित्य आणि अर्थशास्त्र यासारख्या क्षेत्रांतील नोबेल पुरस्कार येत्या काही दिवसांत जाहीर केले जातील.









