त्या पंक्तीतील वळवटाचे पदार्थ म्हणजे सांडग्यांसारखे वाळवून तयार केलेले खाद्य पदार्थांचे नवल तर काय सांगावे? विविध आकाराचे होते. सूक्ष्म सेवेच्या शेवया होत्या. त्या न मोडलेल्या व अखंड होत्या. त्या अति कौशल्याने वळल्या होत्या व क्षीरसागरात घोळल्या होत्या, त्यामुळे त्यांची चव काही आगळीच होती. विवेकतिळवाचे लाडू अतिशय आवडीने वळले होते. ते रसाळ व गोड होते. पापड तर वैराग्याच्या आगीत भाजल्याने सर्वांगी फुगले होते. विविध प्रकारच्या कुरवडय़ा तेलात तळलेल्या होत्या. तसेच सफेद फेण्या तयार केल्या होत्या.
त्रिगुण त्रिकुटीं पचलीं पाहीं । भोकरें खारलीं ठायींच्या ठायीं ।
कृष्णरंगे रंगलीं पाहीं । आलें ठायीं ठेविलें ।
पुर्ण परिपूर्ण पुरिया । सबाह्य गोड गुळवरिया ।
क्षीरसागरिंच्या क्षीरधारिया । इडुरिया सुकुमारा ।
सफेद फेणिया पदरोपदरिं । शुद्ध शर्कारा भरली भरी ।
अमृतफळें ठेविली वरी । अभेद घारी वाढिल्या ।
नुसधी गोडियेची घडली । तैसी खांडवी वाढिली ।
गगनगर्भीची काढिली । घडी मांडिली मांडियाची ।
स्नेहदेठींहुनि सुटलीं । अत्यंत परिपाकें उतटलीं ।
वनिताहातींहून निष्टलीं । फळें घातिलीं शिखरिणी।
अत्यंत सूक्षं आणियाळें । तांदुळा वेळिलें सोज्वळें ।
सोहंभावाचें ओगराळें । भावबळें भरियेलें ।
खालीं न पडतां शीत । न माखतां वृत्तीचा हात ।
ओगराळां भरिला भात । न फुटत वाढिला ।
अन्नावरि÷ वरान्न । विवेकें कोंडा काढिला कांडोन ।
अवघ्यावरी वाढिले जण । वरी वरान्न स्वादिष्ट ।
त्रिगुणांच्या कुटात भोकरे घालून ती खारवून लोणचे तयार केले होते. ते कृष्णरंगात रंगले होते. मांडे करून त्याच्या घडय़ा घातल्या होत्या. जणू आकाशाचा पातळ थर काढून त्याच्या घडय़ा घालून ठेवाव्या असे दिसत होते. पिकून परिपक्व झाल्याने स्नेहदेठातून सहज सुटलेली अतिशय मधुर फळे व फळांचा रस वाढला होता. भावबळे भरलेल्या शुभ्र तांदळाचा भात होता. त्यावर विवेक कोंडा कांडून काढलेल्या डाळीचे वरण वाढले होते.
लेह्य पेय चोष्य खाद्य । भक्ष्य भोज्य जी प्रसिद्ध ।
षड्रसांचे हे स्वाद । केले विविध उपचार ।
जिव्हा चाटून जें घेइजे । लेह्य त्या नांव म्हणिजे ।
घटघटोनि प्राशन कीजे । पेय बोलिजे तयासी ।
रस चोखून घेइजे । बाकस थु कोनि सांडिजे ।
चोष्य त्या नाव बोलिजे । खूण जाणिजे रसाची।
अग्नि उदक लवणेंविण । जें खावया योग्य जाण।
खाद्य म्हणती विचक्षण । केलें लक्षण सूपशास्त्रीं ।
क्षीरभात या नांव अन्न । भोज्य यातें म्हणती जाण। रोटी पोळी आणी पक्वान्न । भक्ष्य जाण यां नांव । ऐसी षड्रसांची गोडी । ताटें वाढिलीं परवडी ।
चाखें जाणती ते गोडी । निज आवडीचेनि मुखें ।
कृष्णस्वदासी जाणतां जाण । अवघियां आणिलें गोडपण । यालागीं वाढिलें वरी लवण । अपूर्ण तें पूर्ण करावया ।
Ad. देवदत्त परुळेकर







