गेले काही दिवस जिल्हा तालीम संघाने घेतलेल्या मेहनतीला यश आले. काल सायंकाळी छत्रपती शाहू क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा शानदार शुभारंभ झाला. 1963 ते 2022 अशा 59 वर्षांच्या फरकाने साताऱ्यात झालेल्या दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे पै. साहेबराव पवार हे साक्षी झाले. उद्घाटन सोहळय़ात बोलताना समोरचा आखाडा आणि नजारा पाहून साहेबरावांचा ऊर भरून आला. काळजाला हात घालणारे भाषण त्यांनी वयाच्या 97 व्या वर्षात केले. कुस्तीची निष्ठा काय असते, ते त्यांच्या भाषणातून जाणवत होते. जिल्हा तालीम संघाने या अवाढव्य स्पर्धेचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलल्याचे दिसत होते. नेटके नियोजन, भव्य आखाडे, पैलवानांची मांदियाळी आणि जोडीला पहिल्या दिवशी कुस्त्या पाहायला प्रेक्षकांची समाधानकारक उपस्थिती होती, त्यामुळे संयोजकही आनंदी होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळय़ात केवळ कौतुकाची भाषणे न होता कुस्ती क्षेत्रासमोरच्या आजच्या प्रश्नांची चर्चा झाली. याचा तमाम कुस्तीप्रेमींना आनंद आहे. नेत्यांनीही आपल्या भाषणात या प्रश्नांना शासनदरबारी मांडण्याची ग्वाही दिलीय.
महाराष्ट्र केसरी आणि कुस्तीगीर परिषदेला राजाश्रय देणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा उल्लेख या स्पर्धेत वारंवार होतोय, कारण लोकनेत्यांनी कुस्तीला राजाश्रय दिला. त्याचबरोबर उर्जितावस्थेसाठी प्रयत्नही केले. जिल्हा तालीम संघाला जागा त्यांनीच मिळवून दिली. इमारत उभारणीसाठी योगदान दिले. साहेबराव पवारांच्या भाषणात हा उल्लेख आला. योगायोग म्हणजे याच लोकनेत्यांचे नातू शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री आहेत. शंभूराज देसाईंनी तालीम संघांची इमारत पूर्ण करण्याबरोबरच महाराष्ट्र केसरी स्पर्धेला दरवर्षी निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शाहू क्रीडा संकुलाच्या भाडय़ाचा प्रश्नही मार्गी लावल्याचे सांगितले. सभापती रामराजेंनीही उमेदीत कुस्ती आणि उतारवयात पैलवानांसमोर येणाऱ्या आर्थिक संकटाचा उल्लेख करताना उगवत्या मल्लांबरोबरच जुन्या मल्लांना मानधन व पदे देण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही तालीम संघाची इमारत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. साहेबराव पवार यांनी प्रत्येक तालमीला प्रशिक्षकाची गरज असल्याचे सांगितले. बाळासाहेब लांडगे यांनीही हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींना पेन्शनचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. परिषदेच्या काही मागण्या आहेत, त्याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कुस्ती क्षेत्राला भेडसावणारे प्रश्न सोडवण्याच्या दिशेने शासनकर्त्यांची पावले पडल्यास या स्पर्धेचे फलित होणार आहे. त्यादृष्टीने या स्पर्धेला महत्व आहे.