प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेकडे महाराष्ट्रचे लक्ष लागलेले आहे. साताऱ्याला कुस्तीची परंपरा आहे. ती परंपरा जोपासली गेली पाहिजे. आपण कुस्ती खेळणाऱ्या मल्लांना मदत करतो, कुस्ती स्पर्धेसाठी मदत करतो. परंतु जे मल्ल आपलं उमेदीचे आयुष्य कुस्तीसाठी वेचतात. त्यांना वार्ध्यक्याच्या काळात शासनाने मदत करायला हवी, अशी भूमिका विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांनी मांडली. दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या स्पर्धेबरोबरच जिल्हा तालिम संघासाठी सर्वतोपरी सहकार्य करु अशी ग्वाही दिली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नियोजनाबाबत कौतुक केले. साहेबराव पवार यांचे मात्र हा सोहळा पाहून ऊर भरुन आले.
64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन छ. शाहु क्रीडा संकुलात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाले. यावेळी कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, सातारा तालिम संघाचे संस्थापक साहेबराव पवार, धनाजी फडतरे, अमोल बुचडे, बलभीम शिंगरे, दीपक पवार, संदीप साळुंखे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रामराजे म्हणाले, अनेक मल्ल साताऱ्याच्या मातीने घडवलेले आहेत. श्रीरंग अप्पा हे फलटणचे होते. ते नंतर माहुलीला आले. सातारा तालिम संघात त्यांनी सराव केला. साताऱ्याची कुस्तीची परंपरा आपण जपली पाहिजे. नुसते कुस्ती खेळणाऱ्यांना मदत करुन चालणार नाही तर ज्यांनी आपलं आयुष्य कुस्तीसाठी घालवल अशा सेवानिवृत्त कुस्तीगिरांना मदत शासनाने केली पाहिजे. त्यांना पद दिले गेले पाहिजे. शासनाला हा निर्णय घ्यायला लागणार आहे. बाळासाहेब तुम्ही यात लक्ष घालाल, अशी विनंती त्यांनी केली. पुढे ते म्हणाले, बाळासाहेब लांडगे आणि सातारचे नाते वेगळे आहे. हल्ली त्यांचे प्रेम कमी झाले आहे. ते पुण्यात भेटत नाहीत. या स्पर्धेमुळे सातारकरांना आनंद होत आहे. कलेक्टर आणि एसपी यांच्या शिस्तीमुळे शेवटी कुस्ती बघायला मिळेल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब पाटील म्हणाले, बऱ्याच वर्षानंतर साताऱ्यात महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा होत आहे. शरद पवार यांनी सांगितले की माझ्या साताऱ्यात स्पर्धा झाली पाहिजे, म्हणून ही स्पर्धा होत आहे. आपल्यातील काही मल्ल उत्तर भारतात जातात. तेथे मेहनत घेतात. कुस्तीचे महत्व मोठे असल्याचे सांगत पुढे ते म्हणाले, 9 तारखेला अंतिम लढत होणार आहे. जिह्यातील मल्लांचे अभिनंदन आणि दीपक पवार यांनी खूप कष्ट घेतले, असेही त्यांनी कौतुक केले.
शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धा 1962 साली झाली होती. त्यानंतर आता शरद पवार यांच्या मान्यतेने सातारा जिल्ह्याला बहुमान मिळाला आहे. डोळ्याचे पारणे फिटेल अशा कुस्त्या पहायला मिळणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्यावतीने संपूर्ण सहकार्य या स्पर्धेला राहील, अशी ग्वाही देत पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्याला कुस्तीची वेगळी परंपरा आहे. खाशाबा जाधव असतील, श्रीरंग अप्पा असतील. खाशाबा जाधव यांच्या स्मारकासाठी प्रयत्न सुरु आहेत. तालीम संघाची इमारतीसाठी त्याकाळी बाळासाहेब देसाई यांनी जागा दिली. आता याच तालिम संघाच्या इमारतीसाठी माझ्याकडून प्रयत्न सुरु आहेत. मागच्या पंचवार्षिक नियोजनमधून पहिल्या टप्यासाठी निधी दिला होता. ते काम पुर्ण झाले. दुसऱ्या टप्याकरता निधीची तरतूद करत आहोत. या स्पर्धेंसाठी व जिल्हा तालिम संघासाठी जिल्ह्यातील सगळे आमदार प्रयत्न करतील, जसं कोल्हापूरचं नाव आहे तसं सातारचही नाव राहील यासाठी प्रयत्न करूया. सातारा तालीम संघासाठी तुम्ही नाही म्हणाला तरीही प्रयत्न करणे हा माझा हक्क आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
साहेबराव पवार झाले भाऊक
सातारा तालिम संघाचे संस्थापक साहेबराव पवार त्यांच्या भाषणात म्हणाले, महाराष्ट्रातील तालमी लयाला का गेल्या. ही तालीम उभी करताना मला अनेक अडचणी आल्या. त्यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्यावडे दहा गुंठे जागा मागितली. त्यांनी सव्वा तीन एकर जागा दिली. आता एवढी मोठी संस्था कुठे सोडणार, संस्था टिकली पाहिजे. अनेक मुलं या संस्थेत घडली. मोठी झाली. पण त्यांच्या उतरत्या वयात परिस्थिती बिकट असते. त्यांच्याकरता सरकारने काहीतरी करावे, अशीही विनंती त्यांनी केली, पुढे ते म्हणाले, सातारा तालिम संघाला 70 वर्ष एक कोच मिळाला नाही. ही गोष्ट सांगू नये पण सांगावी लागते. जिथे कोच नाही तिथे तालीम नाही. मी हे अधिवेशन सगळ्यांच्या सहकार्याने पार पाडेन, असेही भावनिक होवून भाऊंनी सांगितले. सुधीर पवार यांनी सुत्रसंचालन केले.