मनोहर सप्रे/ देवरुख
देवाला हळद लागली.. घाणा भरून झाला.. हिंदू धर्मातील लिंगायत विवाहशास्त्रानुसार होणारे विवाहापुर्वीचे सर्व पारंपरिक विधी पार पडले आहेत. आता साऱयांना प्रतिक्षा आहे ती अपुर्व निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यात वसलेल्या देव मार्लेश्वराच्या आणि साखरप्याच्या गिरीजादेवी या दोन देवतांच्या विवाहाची. सह्यकुशीत होणारा हा देवतांचा कल्याण विधीं सोहळा आज 15 जानेवारीला मकरसंकांतीच्या मुहूर्तावर दुपारी 12 नंतर होणार आहे. यासाठी मंगळवारपासूनच असंख्य शिवभक्त हर हर मार्लेश्वराचा गजर करीत सह्याद्रीच्या कडेकपारीत दाखल झाले असून मार्लेश्वर गिरीजेच्या विवाहासाठी जणू मारळनगरीत भक्तांचा मेळाच जमल्याचा भास होत आहे.
हिरवीगार वनराई, नीरव शांतता आणि मन प्रफुल्लीत करणारा गारवा अशा निसर्गरम्य सानिध्यात मार्लेश्वर यात्रोत्सवातील महत्वाचा क्षण जवळ आला आहे. गेले काही दिवस ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो साक्षात परमेश्वराचा विवाह सोहळा आज (बुधवार) दुपारी 12 वाजता सह्यशिखरावर रंगणार आहे. 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या मार्लेश्वर यात्रोत्सवातील देव मार्लेश्वराच्या विवाहापुर्वीचे सर्व विधी सोमवार आणि मंगळवारी आंगवली येथील मुळ मठात झाल्यावर आज हा विवाहसोहळा रंगणार आहे. रात्री मठात सत्यनारायणाची पुजा झाल्यावर पुजाऱयांनी मठातील मार्लेश्वराचा टोप हलवून तो सुवासिनींकडे दिला.
माता गंगेची मुर्तीही यावेळी मानकरी अणेरावांच्या मांडीवर ठेवत दोघांचेही घाणे भरण्याचा सोहळा पार पडला. यानंतर देवाला आणि गंगामातेला हळद लागल्यावर त्यांना सुवासिनींनी शुध्द पाण्याने स्नान घातले. त्यानंतर देवाचा टोप आणि गंगामातेची मुर्ती जागेवर ठेवण्यात आली. रात्री विवाहापुर्वेचे सर्व धार्मिक विधी झाल्यावर मध्यरात्री 12 वाजताच यजमान वाडेश्वर, देवरुखची दींडी, वांझोळेची कावड, लांजा वेरळमधून आलेल्या दिंडीसह शेकडो भाविकांना बरोबर घेत चर्मकार बंधुंच्या मशालीच्या साहाय्याने मार्लेश्वराच्या पालखीने शिखराकडे प्रस्थान केले. या पालखीसोबत लांजा वेरवलीचे मराठे, पाटगावचे मठाधिपती, आंगवलीचे मानकरी अणेराव, पुजारी जंगम यांच्यासह वाडेश्वरासोबत आलेले मानकरी आणि भाविक यांचा समावेश आहे. नवरदेवाच्या पालखीत गंगामाता आणि मल्लिकार्जुन विराजमान असून रात्री उशिरा या पालख्या पवईजवळ आल्या. त्यानंतर साखरप्यातून गिरीजामातेची पालखी एकत्र आल्यावर सर्व पालख्यांनी हर हर महादेवाची गजर करीत शिखराकडे प्रयाण केले.
पहाटे सर्व पालख्या नियोजित जागेवर थांबल्यावर मुलगीला मागणी टाकणे, मुलीची पसंती, मुलीचे घर पाहणे, विवाहाचा मुहुर्त ठरविणे असे पारंपरिक विधी पार पडले. 360 मानकऱयांना विवाहाचे निमंत्रण देऊन झाले असून आता साऱयांची लगबग सुरू झाली आहे ती कल्याणविधीसाठी. आज दुपारी 12 वाजता हा मंगल सोहळा रंगणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आता साऱयांचीच पावले शिखराकडे वळू लागली आहेत. आज होणाऱया यात्रोत्सवातील मुख्य दिवसासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शिखरावर दर्शनासाठीही रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. आजचा कल्याणविधी सोहळा झाल्यावर सर्व पालख्यांचे शिखरावरच वास्तव्य असणार आहे.









