मनपाच्या प्रशासकांकडून ठराव मंजूर : 1 डिसेंबरपासून महापालिकेकडून देखभाल
प्रतिनिधी /बेळगाव
बुडाच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कुमारस्वामी लेआऊटचे हस्तांतर महापालिकेकडे करण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडली होती. मात्र अलीकडेच ही प्रक्रिया पूर्ण झाली असून हस्तांतर प्रक्रियेच्या ठरावावर मनपा प्रशासकांची मोहोर लागली आहे. त्यामुळे 1 डिसेंबरपासून कुमारस्वामी लेआऊटमध्ये महापालिकेकडून देखभाल करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बुडाच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या वसाहती महापालिकेकडे हस्तांतर करण्यात येतात. कणबर्गी येथील रामतीर्थनगर आणि हनुमाननगर येथील कुमारस्वामी लेआऊटची वसाहत महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आली नक्हती. या वसाहतींमध्ये रहिवाशांची संख्या वाढल्याने नागरी सुविधा पुरविण्याची मागणी होत आहे. मात्र स्वच्छता आणि पथदीप देखभाल व अन्य नागरी सुविधा उपलब्ध करणे बुडा प्रशासनाला अशक्मय आहे. त्यामुळे दोन्ही वसाहती महापालिकेकडे हस्तांतर करण्याचा निर्णय बुडाने घेतला होता.
हस्तांतर करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडे प्रस्ताव दिला होता. पण दोन्ही वसाहतींमधील रस्ते खराब झाले होते आणि गटारींची दुरवस्था झाली होती. सदर कामे पूर्ण करण्यासाठी 86 कोटी खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला होता. रस्ते व गटारी सुस्थितीत करून हस्तांतर करावे किंवा 86 कोटीचा निधी हस्तांतरावेळी देण्यात यावा, अशी अट महापालिकेने ठेवली होती. त्यामुळे हस्तांतराची प्रक्रिया रखडली होती.
बुडानेच रामतीर्थनगर आणि कुमारस्वामी लेआऊटमधील विकासकामे पूर्ण करून हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हनुमाननगर कुमारस्वामी लेआऊट वसाहतीमधील विकासकामे पूर्ण करून हस्तांतराचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार कुमारस्वामी लेआऊट हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाली असून महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आले आहे. हस्तांतराच्या प्रक्रियेचा ठराव मनपाच्या प्रशासकांनी मंजूर केला आहे.
किरकोळ कामे पूर्ण करण्याची अट
दि. 1 डिसेंबरपासून कुमारस्वामी लेआऊटमधील स्वच्छतेच्या कामासह पाणीपुरवठा नियोजनाचे कामकाज महापालिकेकडून पाहण्यात येत आहे. पण काही किरकोळ कामे पूर्ण करण्याची अट महापालिकेने घातली आहे. ही कामे पूर्ण केल्यानंतरच कुमारस्वामी लेआऊटमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. मात्र हस्तांतराच्या प्रक्रियेवर मनपा प्रशासकांची मोहोर लागली असल्याने हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे कुमारस्वामी लेआऊटमधील रहिवाशांना आता महापालिकेकडे आपले व्यवहार करावे लागणार आहेत.









