चोरलेल्या दुचाकीसह आठ मोबाईल जप्त
कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड शहर व एमआयडीसी परिसरातून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढल्याचा प्रकार उघड़कीस आल्याने याप्रकरणी दखल घेऊन कुपवाड पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. चोरीचा छडा लावून संशयावरुन दोघा चोरट्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातील चोरलेल्या व गुह्यात वापरलेल्या तीन मोटरसायकली, आठ मोबाईलसह एकूण २ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहीती मिरजेचे पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर व सहा.निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली.
अटक केलेल्यांमध्ये संशयित सौरभ सूनील मोहिते (वय २२, रा.अष्टविनायक नगर, वारणाली सांगली व योगेश सुरेश शिंदे (वय २२, रा.संभाजीनगर, सावळी रोड मिरज) यांचा समावेश आहे. या दोघांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश मंगळवारी मिरज न्यायालयाने सुनावला. त्यांच्याविरोधात नितीन गणपती ताटे (रा.शिवनेरीनगर, कुपवाड) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, अटक केलेल्या दोघा संशयितांनी एक दुचाकी चोरल्याची तर चारठिकाणी मोबाईल चोरल्याची अशा पाचठिकाणी गुन्हा केल्याची कबुली दिली. यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.