मलिग्रे / वार्ताहर
पर्यटनासाठी मित्राबरोबर कोकणात गेलेला कानोलीचा युवक नितीन संजय सावरतकर (वय३२)हा कुडाळ नजीक साळगाव हायवेवर जागीच ठार झाला. त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र नेताजी भोगण हा जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,कानोली येथील नितीन संजय सावरतकर हा मुंबई येथे चालक म्हणून कार्यरत आहे.
होळी निमित्त सुट्टीवर गावी आला होता ,शुक्रवारी मित्रांसोबत होळी खेळून काल शनिवार सायंकाळी पर्यटन करण्यासाठी आपला मित्र नेताजी याला घेऊन दुचाकीवरून गेला होता, पर्यटन करून आज गावी परतत असताना कुडाळ नजीक साळगाव हायवेवर एक पादचारी रस्ता ओलांडत असताना नितीन याचा दुचाकीचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी त्याला ठोकरून पलटी झाली.
यामध्ये नितीन याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. त्याचा मित्र नेताजी जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद कुडाळ पोलीस ठाण्यात झाली आहे. निखिल हा अविवाहित असून त्याच्या पश्चात लहान भाऊ आई वडील असा परिवार आहे .त्याच्या निधनाने कानोली गावावर शोककळा पसरली आहे.