वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स मास्टर्स महिलांच्या टेनिस स्पर्धेत रशियाच्या कुडरमेटोव्हाने जपानच्या ओसाकाचा पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. त्याचप्रमाणे फर्नांडिस, पाओलिनी व बेडोसा यांनी आपले विजय नोंदवीत तिसरी फेरी गाठली.
महिला एकेरीच्या शनिवारी झालेल्या दुसऱया फेरीतील सामन्यात रशियाच्या कुडरमेटोव्हाने जपानच्या नाओमी ओसाकाचा 6-0, 6-4 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. हा सामना 80 मिनिटे चालला होता. कुडरमेटोव्हाचा तिसऱया फेरीतील सामना झेकच्या बोझकोव्हाशी होणार आहे. अन्य एका सामन्यात लीली फर्नांडिसने ऍनीसिमोव्हाचा 2-6, 7-6 (7-0) असा पराभव केला. प्रकृती नादुरूस्तीमुळे ऍनीसिमोव्हाने हा सामना अर्धवट सोडला. इटलीच्या पाओलिनीने साबालेन्काचा 2-6, 6-3, 6-3, स्वीसच्या गोलुबिकने कझाकस्तानच्या पुतीनसेव्हाचा 6-3, 2-6, 6-4 त्याचप्रमाणे या स्पर्धेतील विद्यमान विजेती पाओला बेडोसाने झेकच्या मार्टिनकोव्हाचा 6-2, 7-6 (7-4), स्पेनच्या सारा टोर्मोने स्लोव्हेनियाच्या ज्युव्हेनचा 3-6, 7-5, 6-3 असा पराभव करत तिसऱया फेरीत प्रवेश केला.









