प्रतिनिधी / राय
मोपा विमानतळाच्या बांधकामासाठी ज्या 14 कुटूंबानी आपल्या 78.48 लाख चौरस मीटर जमिनीचा त्याग केला त्या कुटूंबाच्या वाटय़ाला पूनर्वसनाच्या नावाखाली जे भोग आलेले त्या सर्व कुटूंबाच्या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती कुडतरी मतदारसंघाचे आमदार आलेक्स रिजनाल्द लॉरेन्स यांनी केली होती.
याप्रकरणी श्री. लॉरेन्सो यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहीले होते आणि या प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती केली होती.
या कुटूंबासाठी जी घरे बांधून देण्यात आलेली आहेत ती घरे कनिष्ठ दर्जाची तसेच या घरासाठी वापरण्यात आलेली सामुग्री हलक्या दर्जाची असल्याचे आपल्याला (लॉरेन्सो) सांगण्यात आलेले आहे. पावसाच्या दिवसात या घरांच्या छपरातून पाणी गळत असल्याने कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागत असल्याचे आम. लॉरेन्सो यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेला आणून दिलेले होते.
या कुटुंबाना 800 चौरस मीटर जमीन सरकारने दिलेली असली तरी अजूनपर्यत ही जमीन त्यांच्या नावावर झालेली नसल्याची खंत आम. लॉरेन्सो यांनी व्यक्त केली होती.
प्रत्येक कुटूंबात जवळ जवळ 15 व्यक्ती असल्यामुळे 100 चौरस आकाराची घरे अपुरी पडत आहेत. ही घरे निसरत्या आकाराने असल्यामुळे आणखी एक मजलाही बांधता येत नाही. देण्यात आलेली जमीन नापीक असल्यामुळे या जमिनीवर एक मीटर उंच इतका मातीचा भराव टाकण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अजून अशा प्रकारची माती काही टाकण्यात आलेली नसल्याचेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिले होते आणि या बाबीत लक्ष घालण्याची विनंती केली होती.









