वार्ताहर/ कुडची
बेळगाव जिल्हय़ात कुडची येथे कोरोनाबाधितांची आढळलेली संख्या लक्षात घेत हा भाग रेडझोन घोषित करताना कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत कुडचीत 22 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 17 रुग्णांची उपचारानंतर सुटका करण्यात आली. यातील एका रुग्णामध्ये पुन्हा कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याला विलगीकरण कक्षात ठेवले आहे. यामुळे अद्याप 6 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर द्वितीय संपर्कातील 20 जणांच्या स्वॅब तपासणीसाठी नेण्यात आले असून या स्वॅब अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुडची नगरपरिषद व्याप्तीत 15 तर ग्रामपंचायत हद्दीत 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 5 एप्रिल रोजी कुडचीत दिल्लीहून परतलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर ही संख्या 22 पर्यंत पोहचली होती. याची दखल घेत प्रशासनाने सीलडाऊन कडक करताना सर्व त्या खबरदारी घेण्यात आल्याने येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. 21 एप्रिलला पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची यशस्वी उपचारानंतर सुटका करण्यात आली असून आतापर्यंत 17 जणांची कोरोनामुक्तीनंतर सुटका करण्यात आली होती. मात्र येथील एकामध्ये उपचारानंतर पुन्हा पॉझिटिव्ह लक्षणे आढळून आल्यानंतर त्याला विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे अद्याप 6 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांचीही लवकरच सुटका होणार असल्याचे समजते.
प्राथमिक संपर्कातील 13 जणांचे अहवाल निगेटिव्ह
प्राथमिक संपर्कात आल्यानंतर क्वारंटाईन करण्यात आलेल्यांपैकी फक्त 13 जण क्वारंटाईन आहेत. त्यांचा अहवालही निगेटिव्ह आले आहेत. मात्र अद्याप त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्या नसल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले नाही. हा कालावधी संपताच त्यांची सुटका करण्यात येणार असल्याचे समजते.
परराज्यातून येणाऱयांची संख्या वाढली
परराज्यात आणि परजिल्हय़ात अडकलेले नागरिक लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने आपल्या गावी परतत आहेत. दरम्यान कुडचीत येणाऱया प्रवाशांचीही संख्याही वाढत आहे. त्यांना गावाबाहेर किंवा अन्य ठिकाणी प्रशासनाकडून क्वारंटाईन करण्यात येत आहे. जेणे करुन पुन्हा संसर्ग वाढताना कोरोनाबाधितांची संख्या वाढणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी बाहेरुन येणाऱया प्रवाशांनी खबरदारी घेताना प्रशासनास सहकार्य करताना क्वारंटाईन व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









