प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडेत कित्येक वर्षांपासून गणेश चतुर्थीचा बाजार हा मोठय़ा प्रमाणात भरत होता. पण गेल्या वषी कोविड-19 महामारीचे चतुर्थी सणावर सावट आले व बाजार कोलमडला. गोरगरीब शेतकरी, जे या बाजारातील विक्रीवर आपली उपजीविका चालवायचे, ते अडचणीत आले. पण यंदा महामारीचा जोर कमी झाल्यामुळे कुडचडेत गेल्या वषीपेक्षा चांगला बाजार भरलेला दिसून आला आहे. त्यात सांगे, उसगाव, नेत्रावळी, चांदर, रिवण व इतर भागांतील शेतकरी विविध सामग्री घेऊन सहभागी झाले आहेत. महामारी सुरू झाल्यापासून बाजार बराच खचलेला असला, तरी सध्या फैलाव कमी झाल्याने लोक बाजारात येऊ लागले आहेत. त्यामुळे व्यापाऱयांना त्यांच्याकडील माल खपण्याची आशा वाटू लागली आहे. पावसाळा सुरू झाला की, शेतकरी विविध प्रकारच्या भाज्या व फळांची लागवड करून हे उत्पन्न चतुर्थीच्या बाजारात विक्रीसाठी आणत असतात. शहरात राहणाऱया लोकांना या फळ-भाज्या त्यामुळे सहज उपलब्ध होतात. मात्र यंदा त्यांच्या मेहनतीचा मोबदला चांगल्या प्रमाणात मिळणार की नाही अशी शंका वाटत होती. सध्या बाजार चांगला भरलेला असला, तरी या ग्रामीण शेतकऱयांना सरकारने अनुदान देण्याची गरज येथील काही माटोळी साहित्याच्या विपेत्यांनी व्यक्त केली.









