काँग्रेस उमेदवार अमित पाटकर यांची टीका : कुडचडेच्या विकासासाठी आराखडा तयार
प्रतिनिधी /कुडचडे
आज कुडचडेत जे काही चालले आहे ते वेगळे सांगण्याची गरज नाही. आज चालले आहे ते पुढे होऊ नये यासाठी लोकांनीच विचार केला पाहिजे. प्रत्येकाला माहित आहे की, कोविड महामारीच्या काळात स्थानिक आमदारांचे वर्तन कसे होते. त्यांना कुडचडेच्या लोकांच्या भवितव्याबद्दल व आर्थिक स्थितीबद्दल काहीच पडलेले नाही. गेल्या दहा वर्षांत या आमदारांनी कुडचडेसाठी व कुडचडेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणतेच कार्य केलेले नाही, अशी टीका कुडचडे मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अमित पाटकर यांनी नुकतीच पत्रकारांशी बोलताना केली.
खाणबंदीमुळे अनेकजण बेरोजगार झालेले आहेत. मात्र भाजप सरकार व स्थनिक आमदार या लोकांसाठी काहीच करू शकलेले नाहीत. पण सरकारात असलेल्या मंत्र्यांनी आपली भरभराट साधण्याचा कोणताच मार्ग सोडलेला नसून त्यात कुडचडेचे आमदारही सामील आहेत हे नुकत्याच जाहीर झालेल्या संपत्तीच्या अहवालावरून लोकांना दिसून आलेले आहे, अशी टीका श्री. पाटकर यांनी पुढे केली.
विकास आराखडा तयार
कुडचडेच्या विकासासाठी अगोदरच आराखडा तयार केलेला आहे. गेली दहा वर्षे स्थानिक लोकांना त्रास झालेला आहे. तो त्रास परत कधीच होणार नाही अशा पद्धतीने पुढे कुडचडेत काम होणार आहे. जे काही प्रकल्प पुढे होणार आहेत त्यापैकी ज्यांचा सदर ठिकाणी काहीच उपयोग नाही त्या प्रकल्पांचा नव्याने आराखडा तयार करून ते स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे श्री. पाटकर यांनी जाहीर केले.
कुडचडेतील महिलांना स्थानिक आमदारांनी महिला मंडळ वा स्वयंसाहाय्य गट स्थापित करून दिलेले आहेत. पण सदर गटांना आर्थिक प्राप्ती कशी होणार याकडे कधीच लक्ष दिले नाही. अशा प्रत्येक महिला मंडळ व स्वयंसाहाय्य गटाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने आखणी केलेली आहे. त्याचबरोबर कुडचडेत वाढत असलेल्या बेरोजगारीवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार. काकोडा येथील औद्योगिक वसाहतीत कोणत्याच चांगल्या कंपन्या नसल्यामुळे रोजगार तयार होत नाहीत. त्यात आपण ताबडतोब लक्ष घालणार, असे आश्वासन त्यांनी दिले.
लोकांना बदल हवा
सध्या कुडचडे मतदारसंघात आपण फक्त पाच लोकांना घेऊन प्रचार करत असल्याच्या मुद्यावरून आपल्याविषयी अफवा पसरविल्या जात आहेत. पण आपला कुडचडेतील मतदारांवर विश्वास आहे. त्यामुळे आपण पाचजणांना सोबतीला घेऊन प्रचार करत आहे. आपली जिद्द पाहून लोकांनी आपल्याला प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन श्री. पाटकर यांनी केले. आपल्याला जो प्रतिसाद मिळत आहे तो पाहता लोकांना कुडचडेत बदल हवा हे स्पष्टपणे दिसून येते. कुडचडे परिसरात काँग्रेसचा जो गाजावाजा सुरू झाला आहे त्यामुळे चिंतेत पडून आपल्या बदनामीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकांनी दिशाभूल करून न घेता विचार करून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर सहकार्य करणाऱया सर्वांचे व खासकरून माजी आमदार श्याम सातार्डेकर, रामराव देसाई, डॉमनिक फर्नांडिस व नगरसेवक यांचे पाटकर यांनी आभार मानले.









