ऑनलाईन टीम / पुणे :
ज्याप्रमाणे कोणत्याही खेळाच्या मैदानाची मशागत केली जाते, त्याचप्रमाणे तालमीतील मातीची मशागत होणे गरजेचे असते. अशा मशागतीमुळे शेतातील मातीतून जसे बीजरुपी अंकूर फुटतात, तसेच तालमीतील लाल मातीतून नामवंत मल्ल तयार होतात. त्यामुळे तालमीतील मातीची मशागत करण्याकरीता सदाशिव पेठेतील कुंजीर तालमीला मारणे परिवारतर्फे ताक, हळद, लिंब, तेल, मीठ असा लाल मातीचा खुराक देण्यात आला.
कुंजीर तालमीचे वस्ताद स्व. गुरुवर्य निवृत्ती मारणे यांच्या जयंतीनिमित्त मारणे परिवारतर्फे तालमीमध्ये कुस्तीपटूंकडे हा लाल मातीचा खुराक सुपूर्द करण्यात आला. यावेळी डॉ.शैलेश गुजर, पै.श्रीकृष्णदादा बराटे, विशाल गायकवाड, रामदास मारणे, शाम मारणे यांसह पै. अमर गायकवाड, हेमंत माझिरे, श्रीकांत चोरगे, ॠतिक पायगुडे, केदार शेळके, प्रथमेश वीर, युवराज खोपडे, प्रविण दहिभाते, जय खोपडे आदी उपस्थित होते. सुमारे १०० लीटर ताक, ५ तेलाचे डबे, ५० किलो हळद, २ गोणी लिंब, २५ किलो मीठ असा मातीचा खुराक यावेळी कुस्तीपटूंकडे देण्यात आला.
डॉ.शैलेश गुजर म्हणाले, जो लाल मातीशी जोडलेला असतो, त्याच्याकडे अहंकार कधीही नसतो. कुस्ती क्षेत्रातील मल्ल हे लाल मातीशी नाळ जोडलेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडे अहंकार नसतो. प्रत्येक रोगाला हरविण्याचे सामर्थ्य लाल मातीमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येकाने कुस्ती किंवा यांसारख्या खेळांच्या माध्यमातून मातीशी जोडून राहणे गरजेचे आहे.
पै.श्रीकृष्णदादा बराटे म्हणाले, मातीला जे खाद्य लागते, ते आज येथे देण्यात आले. कोविडच्या काळात बहुतेक तालमी बंद आहेत. मात्र, यापैकी काही तालमी पुन्हा सुरु होत आहेत. स्व. गुरुवर्य निवृत्ती मारणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, वरिष्ठ गटापर्यंत लढलेले अनेक कुस्तीपटू होऊन गेले. नव्या पिढीने तालमींकडे पुन्हा वळायला हवे. आपला शारिरीक विकास साधत मातीशी असलेले नाते अधिक दृढ करायला हवे.