आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; कामाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ
प्रतिनिधी/ सातारा
ऐतिहासिक किल्ले अजिंक्यताराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. यामुळे पर्यटक आणि खास करून सकाळ, सायंकाळी वॉकिंगसाठी जाणाऱया नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे किल्ले अजिंक्यताराच्या रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध झाला असून लवकरच हा रस्ता चकाचक होणार आहे आणि त्यामुळे सर्वांचीच गैरसोय दूर होणार आहे.
किल्ले अजिंक्यतारा महादरवाजा ते खाली पायथ्यापर्यंत रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. दररोज सकाळ आणि सायंकाळी किल्ल्यावर चालण्यासाठी, व्यायामासाठी जाणाऱया लोकांची संख्या फार मोठी आहे. तसेच दररोज किल्ल्यावर असंख्य पर्यटक ये-जा करत असतात. रस्ता खराब झाल्याने या सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी डीपीडीसीमधून 2 कोटी 75 लाख रुपये निधी मंजूर करून घेतला. या निधीतून किल्ल्याच्या महादरवाजापासून पुढे 600 मीटरपर्यंतचा रस्ता काँक्रीटचा करण्यात येणार आहे. तसेच तिथून पुढील रस्त्याच्या कामासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याच्या पर्यटन विभागाकडून 5 कोटी रुपये निधी उपलब्ध करून घेतला आहे.
या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार शिवेंद्रराजे यांच्या उपस्थितीत अजिंक्यतारा किल्ला ग्रुपच्या सदस्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी अमोल मोहिते, अविनाश कदम, शेखर मोरे पाटील, धनंजय जांभळे, भालचंद्र निकम, विजय देसाई, आप्पा कोरे, कन्हैयालाल राजपुरोहित, धनंजय जाधव, दीपक देशमुख, दत्ता शिर्के, दादा भोसले, कमलाकर माळी, नितीन कारंडे, श्री. मोरे, गजानन चवरे, ओमकार खोले, अजय चव्हाण, प्रदीप शेळके, सागर जाधव, प्रताप पवार, फिरोज पठाण, पपू घोरपडे, रवी पवार, नीतीराज सूर्यवंशी, अमोल नलवडे, पोपट मोरे यांच्यासह किल्ला ग्रुपचे सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रस्त्याचे काम मार्गी लागल्याने किल्ला ग्रुपच्या सदस्यांनी आ. शिवेंद्रराजे यांचे आभार मानले.
रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, किल्ले अजिंक्यतारावर दररोज असंख्य पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची ये-जा असते. यामध्ये सकाळी व सायंकाळी चालणे, फिरणे, व्यायाम करण्यासाठी लोक येत असतात. रस्ता खराब झाल्याने लोकांची गैरसोय होत होती, हि गैरसोय आता दूर होणार आहे. पावसामुळे भविष्यात रस्ता खराबच होऊ नये यासाठी महादरवाजा ते पुढे 600 मीटर रस्ता काँक्रीट करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम लवकर सुरु करून हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि सर्वांची गैरसोय दूर होईल.
अजिंक्यतारा रस्त्यासाठी ‘तरुण भारत’चा पाठपुरावा
मराठय़ांची राजधानी असणाऱया साताऱयातील किल्ले अजिंक्यतारा ही सातारकरांसह सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. परंतु या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे इतिहासप्रेमी तसेच सातारकरांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत ‘तरुण भारत’ने अनेकवेळा आवाजही उठवला होता. अखेर या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असून त्या कामाचा शुभारंभही करण्यात आला आहे.








