2 तासात मिळणार घरपोच साहित्य – 14 शहरात राबवणार उपक्रम
वृत्तसंस्था/ बेंगळूर
अमेरिकेतील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉन येत्या काळात भारतात किराणा व्यवसायाला प्राधान्य देणार आहे. याअंतर्गत 14 शहरांमध्ये 2 तासात ऑर्डर केलेल्या साहित्याचा पुरवठा कंपनीकडून केला जाणार असल्याचे समजते.
ऍमेझॉन प्रेश नावाने देशातील आघाडीच्या 14 शहरांमध्ये स्टोअरमार्फत भाज्या, फळे, डेअरी पदार्थ व इतर पदार्थांची डिलिव्हरी ऍमेझॉन करणार आहे. यामध्ये किराणा सामान, सौंदर्य प्रसाधने, वैयक्तिक काळजीची उत्पादने यांचाही समावेश असेल. सदरच्या शहरांमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत ग्राहकांना आपली ऑर्डर 2 तासात घरी मिळणार आहे. भारतात 300 हून अधिक शहरांमध्ये नव्या स्टोअरमार्फत सेवा देण्यासाठी कंपनी तत्पर राहणार आहे.
ऑनलाइन खरेदीदारांना चांगला अनुभव प्राप्त करून देण्यासाठी कंपनी कटीबद्ध असणार आहे. बचतीसह ऍमेझॉन प्रेश ऑनलाइन खरेदीतील अडथळेही कमी करणार आहे. आघाडीवरच्या शहरांमध्ये बेंगळूर, दिल्ली, पुणे, मुंबई, चेन्नई, फरीदाबाद, गुरूग्राम, गाझियाबाद, नोएडा, अहमदाबाद, म्हैसूर, हैदराबाद, कोलकाता यांचा समावेश असणार असून या शहरामध्ये वरील सेवा आधी देण्यावर कंपनी भर देणार आहे.









