प्रतिनिधी /बेळगाव
सद्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने शनिवार आणि रविवार विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. विकेंड कर्फ्यूच्या दुसऱया दिवशी किरकोळ वर्दळ वगळता शहरात शांतता दिसून आली. मेडिकल, दवाखाने तर काही ठिकाणी किराणा दुकाने, डेअरी, फळ विक्री, भाजी विक्री, कृषी केंद्रे, स्वीटमार्ट दुकाने वगळता शहरात सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला.
शहरातील नरगुंदकर भावे चौक, काकतीवेस, शनिवार खूट, समादेवी गल्ली यासह इतर ठिकाणी किरकोळ भाजी विपेते बसले होते. मात्र खरेदीदार नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. त्यामुळे दररोजच्या प्रमाणे असणारी वर्दळही कमी असलेली पहायला मिळाली. तर काही ठिकाणी केवळ चहा टपरी व लहान हॉटेलमध्ये गर्दीही पहायला मिळाली.
रविवारपेठेत अवजड वाहनांची वर्दळ
विकेंड कर्फ्यू लागू असला तरी रविवारी मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवारपेठेतील काही दुकाने सुरू होती. त्यामुळे या भागात काही प्रमाणात वर्दळही दिसून आली. विकेंड कर्फ्यूमुळे सर्व रस्त्यावर शांतता पसरली होती. या संधीचा फायदा घेत काही अवजड वाहनधारकांनी आपल्या वाहनातील माल उतरविला. त्यामुळे रविवारपेठेत अवजड वाहनांची वर्दळ दिसून आली. तर काही दुकाने सुरू राहिल्याने मालाची खरेदी करून वाहने लोड करण्याचे कामदेखील सुरू होते.
विकेंड कर्फ्यूत रविवारपेठेत गर्दी नसल्याने अवजड वाहनांना माल भरणे आणि उतरविणे सोयिस्कर झाले. त्यामुळे काही ठिकाणी हमालांचीदेखील वर्दळ पहावयास मिळाली.









