ऑनलाईन टीम / सोलापूर :
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुन पराभव झाला. या पराभवामुळे काँगेसवर मोठी नामुष्की ओढवली आहे. निर्णायक लढतीत येणाऱ्या अपयशामुळे काँग्रेस अस्तित्त्वहिन होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज असल्याचा सल्ला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला. एका मराठी दैनिकात लिहिलेल्या लेखातून शिंदे यांनी पक्षाला हा सल्ला दिला आहे. दरम्यान, हायकमांडने याची दखल घेतली असून, पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी काही नेत्यांची नियुक्तीही केली आहे.
शिंदे यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की, देशात सक्षम विरोधी पक्षाची पोकळी विस्तारत आहे. 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये प्राधान्याने पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाचे काय चुकले याचा विचार करायला हवा. पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता नव्हती. पंजाबमधील निवडणुकांनंतर त्यांनी आपले नेतृत्व कुचकामी असल्याचे सिध्द केले आहे. एका मोठय़ा पक्षाचे क्षीण होणे लोकशाहीच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही. पक्षाने आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
पंजाबमध्ये 32 टक्के मागासवर्गीय जनता आहे. त्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा नेता मुख्यमंत्री असतानाही तिथे सरकार पुन्हा येऊ शकले नाही. याचा अर्थ असा की, संघटन आणि प्रशासन या दोन्ही ठिकाणी पक्ष कमकुवत झाला, असा होतो. मात्र, सोनिया गांधी या सर्वांवर मात करुन परिस्थिती पलटवण्यात यशस्वी होतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला आहे.








