वार्ताहर/ कास :
कास परिसरात मंगळवार दुपारपासुन पावसाला सुरवात होवून बुधवारी आलेल्या चक्रीवादळामुळे हवेचा वेग जोरात असल्याने सातारा कास रोडवर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाली होती.
पावसाने मंगळवारी दुपारी हजेरी लावून जिह्यातील पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱया कास, बामणोली, परळी परिसरात मंगळवारी रात्री रिमझीम तर बुधवारी सकाळपासुन जोरदार बँटीग करत दमदार आगमन केले. पावसाबरोबर आलेल्या चक्रीवादळामुळे बुधवारी दुपारी कास रोडवर पेट्री देवकल व पारांबे गावाजवळ झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाली होती. विज वाहक तारा लोबंकळत असल्याने कोरोनाच्या संकटामुळे तुरळक सुरु असणारी वाहतुकही खोळंबली. पेट्री विभागावर कार्यरत असणारे वायरमन सुतार यांनी तात्काळ हजर होऊन लोंबकळणारी विजवाहक तार हटवल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. पहिल्याच पावसाने परिसराला झोडपून काढल्याने ओढे-नाले, छोठेमोठे धबधबे दुतडी भरून वाहत होते. सकाळपासुनच भागातील विजपुरवठा खंडीत झाला आहे. तसेच वादळाने अनेक गावातील घरांचे पत्रे व कौले उफसून टाकल्याने नुकसानीच्या किरकोळ घडल्या आहेत.









