प्रतिनिधी/ चिपळूण
सागरी कासव संवर्धन मोहिमेंतर्गत दाभोळ किनाऱयावर वनविभागाने तात्पुरते कुंपण घालून तयार केलेल्या संवर्धन केंद्रातील नायलॉन जाळय़ात अडकून कासवांच्या असंख्य नवजात पिल्लांचा तडफडून मृत्यू झाला आहे. एका पर्यटकाने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत मदतीची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर खडबडून जागी झालेली वनविभागाची यंत्रणा बुधवारी सकाळीच दाभोळमध्ये धावली. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या या दुर्घटनेमुळे कासव संरक्षण मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सागरी जीवसृष्टीमध्ये कासवांची भूमिका महत्त्वाची असल्याने येथे आढळणारी ऑलीव्ह रिडले टर्टल ही प्रजाती वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972चे अधिसूचि-1मध्ये समाविष्ट आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने 2002पासून जिल्हय़ाच्या सागरी किनारपट्टीवर सागरी कासव संरक्षण व संवर्धन मोहीम स्थानिकांच्या मदतीने वनविभागाकडून राबवण्यात येत आहे. या मोहिमेवर मोठा खर्चही केला जात आहे. उत्तर रत्नागिरीत यावर्षी गुहागर, मंडणगडमधील वेळास, तर दापोली तालुक्यात दाभोळ, कोळथरे, लाडघर, आंजर्ले, केळशी, मुरूड, कर्दे आदी सात ठिकाणी वसाहतींची निर्मिती करण्यात आली आहे.
सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते मार्च हा ऑलीव्ही रिडले प्रजातीचा विणीचा हंगाम असतो. या कालावधीत किनाऱयाच्या वालुकामय भागात हाय टाईड लेव्हलपासून काही अंतरात खड्डा खोदून त्यामध्ये अंडी घालून मादी कासवे या खड्डय़ात माती भरून समुद्रात निघून जातात. त्यानंतरची सर्व प्रक्रीया निसर्गावर अवलंबून राहते. मात्र त्यामध्ये अनेक पद्धतीचे अडथळे निर्माण होतात. खड्डय़ातील अंडी कुत्रे, कोल्हे, साळींदर हे प्राणी उकरून नष्ट करतात. अंडी काढून त्याचा खाण्यासाठी वापर केला जातो. त्यामुळे विणीच्या हंगामात किनाऱयावर वालुकामय भागात सुरक्षित ठिकाण निवडून तेथे वनविभगाकडून संवर्धन केंद्र तयार केले जाते.
दोन दिवसांपूर्वीच दाभोळ येथे आलेल्या पर्यटकाना वनविभागाच्या हॅचरीजच्या कुंपणातील जाळीमध्ये कासवांची नवजात पिल्ले अडकून पडलेली दिसली. काही पिल्ले मृतावस्थेत होती, तर काही तडफडत सुटकेचा प्रयत्न करताना दिसत होती. मोठय़ा संख्येने पिल्ले असलेल्या परिसरात कोणीही नसल्याने एका पर्यटकाने याचा व्हिडीओ तयार करून त्यांच्या सुटकेसाठी मदत मागितली. हा व्हिडीओ मंगळवारी रात्री व्हायरल झाल्यानंतर बुधवारी सकाळीच दापोली वनविभागाची यंत्रणा दाभोळमध्ये दाखल झाली. त्यानंतर जाळय़ात अडकलेल्या पिल्लांची सुटका केली. यामध्ये मृत पिल्लांची संख्या सात-आठ असल्याचे वनविभाग सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांची संख्या मोठी आहे. नवजात पिल्लांच्या तडफडण्याने अनेकांचे हृदय हेलावले. त्याचबरोबर वनविभागाच्या कारभाराबाबतही संताप व्यक्त केला जात आहे..