श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या बडगाममधील मोचवा येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या तुंबळ चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. जवानांनी एक एके-47 रायफल आणि पिस्तूलदेखील जप्त केले आहे. या चकमकीनंतर अन्य सहकाऱयांच्या शोधासाठी संबंधित परिसरात जवानांकडून शोधमोहीम राबविण्यात आली. तथापि, सायंकाळपर्यंत या मोहीमेत आणखी यश मिळू शकले नाही.
गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाकडून व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. बडगाममधील चकमकीपूर्वी बनिहालमध्ये ग्रेनेड हल्लाही झाला होता. शुक्रवारी उशिरा झालेल्या या हल्ल्यात दोन जण जखमी झाले होते. मागील दोन दिवसांमध्ये ग्रेनेड हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.









