भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर
श्रीनगर / वृत्तसंस्था
उत्तर भारताचा बहुतांश भाग शनिवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. भूकंपाची तीव्रता मोठी असल्यामुळे पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय चंदीगड आणि दिल्ली, एनसीआर परिसरामध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती देण्यात आली. भूकंपाचे केंद्र इस्लामाबादपासून सुमारे 180 किलोमीटर अंतरावर अफगाणिस्तान-ताजिकिस्तानच्या सीमारेषेजवळ होते.
जम्मू-काश्मीरमधील काश्मीर खोरे आणि जम्मूतील सांभामध्ये शनिवारी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. भूकंपाचे झटके जाणवताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली. हे धक्के काही सेकंद जाणवले. मात्र, या दरम्यान घर, जमीन हलत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, पंतप्रधानांनी या नैसर्गिक आपत्तीसंबंधी काश्मीरच्या उपराज्यपालांशी संपर्क साधत नुकसान आणि घटनेबाबतचा आढावा घेतला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याही भागातून मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त आले नव्हते.









