सुधाकर काशीद / कोल्हापूर
राजश्रीताई राजेंद्र पाटील या रोज सायंकाळी सहा वाजता आपल्या घराच्या टेरेसवर येतात. सोबत काही खाद्यपदार्थ असतात. त्या टेरेसवर येऊन उभारतात तोच त्यांच्या सभोवती तीस-चाळीस कावळे फेर्या मारू लागतात. काव काव करत रान उठवतात. कावळ्यांच्या या घेर्यात राजश्रीताई अगदी सहज उभ्या असतात. त्या आपल्या सोबत आणलेला खाऊ टेरेसच्या कठड्यावर पसरवतात. सारे कावळे त्याच्यावर ताव मारतात. तिथेच ठेवलेल्या एका परातीत पाणी पितात आणि क्षणभर थांबून पुन्हा निघून जातात.
कोल्हापुरातील सणगर गल्ली मंगळवार पेठ, तालीम परिसरात मेवेकरी पाटलांच्या टेरेसवर गेली चार वर्ष कावळ्यांची ही पंगत भरत आहे. एकही दिवस न चुकता राजश्री राजेंद्र पाटील व त्यांचा परिवार या कावळ्यांना घास भरवत आहे. सायंकाळी सहा वाजले की राजश्रीताई टेरेसवर येणार आणि क्षणात सभोवती 30 ते 40 कावळे खाऊसाठी फेर धरणार हे आता ठरूनच गेलेले आहे. पक्षी आणि माणूस यांच्यात लळा लागला तर एक निसर्ग पूरक नवे नाते कसे जुळले जाऊ शकते, याचे हे एक उदाहरण ठरले आहे.
सणगर गल्ली ते पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या रस्त्यावर हे मेवेकरी पाटलांचे घर आहे. त्या परिवारातील राजश्रीताई टेरेसवर गेले की त्यांना जाणवायचे आपल्या सभोवती दोन-तीन कावळे अगदी न घाबरता वावरतात. त्यामुळे त्यांनीही अंदाज घेत घेत या कावळ्यांना धान्य, कडधान्य, घरातील खाद्यपदार्थ घालणे सुरू केले. नंतर नंतर तर तो दिनक्रमच ठरून गेला. पण पहिल्यांदा दोन-तीन अशा संख्येने येणारे कावळे पुढ पुढे तीस-चाळीस या संख्येने येऊ लागले. आणि दिवस मावळायला लागला की पाटलांच्या टेरेसवर कावळे जमू लागले.
आता गेली चार वर्ष राजश्रीताई या कावळ्यांना खाऊ घालतात. त्यांनी यात एक दिवशी खंड पडू दिलेला नाही. काही कारणाने अडचण असली तर त्यांचा मुलगा शिवतेज टेरेसवर खाऊ ठेवतो आणि निघून जातो. कावळे हे आपल्या कुटुंबाचे घटक समजून त्या घरात केलेल्या अन्नपदार्थांचा काही भाग या कावळ्यासाठी खाऊ घालतात. त्यामुळे सणाच्या दिवशी हे कावळे पोळी खातात. रविवार, बुधवारी मांसाहार करतात. त्यादिवशी पाटलांच्या घरात जे काही शिजले आहे, त्याचा हे कावळे आस्वाद घेतात.
सायंकाळी सहा ते सव्वासहा, साडेसहा ही वेळ राजश्रीताई मी कावळ्यांसाठी राखून ठेवली आहे. त्यावेळेस त्या कोठे बाहेर जाणे टाळतात. कारण सारे कावळे ताईंच्या हातातून हक्काने खाद्य घेतात. सगळेजण खाद्य खातात. पाणी पितात. आणि क्षणभर थांबून सर्वजण सिद्धाळा गार्डनच्या दिशेने उडून जातात. आजुबाजुच्या टेरेस वरून अनेकजण राजश्रीताई व काऊ-चिऊच्या घासाचा क्षण कौतुकाने अनुभवत असतात.
मुक्या प्राणी पक्षांचा मला खूप लळा आहे. आता पक्षांनाही आम्हा पाटील परिवाराचा लळा लागला आहे. निष्पाप कावळे माझ्या टेरेसवर न चुकता येतात. माझ्या हातचा घास अगदी हक्काने खातात. हा क्षण माझ्या दृष्टीने खूप वेगळा आनंद आणि समाधान देणारा आहे. इतरांनीही आपापल्या टेरेसवर पक्ष्यांसाठी आपला थोडा तरी वेळ राखून ठेवावा. आणि माणूस व निसर्ग यांच्यातल्या नात्याचा गोडवा अधिक घट्ट करावा.
– राजश्री पाटील मेवेकरी









