कासेगाव / वार्ताहर
वाळवा तालुक्यातील काळमवाडी येथील अस्वले मळ्यात बाबुराव अस्वले यांच्या विहिरीत पडून बिबट्याच्या पिलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (०४ फेब्रुवारी) सकाळी उघडकीस आली. अस्वले वीजपंप चालू करण्यासाठी शेतात गेले असता त्यांना त्यांच्या विहिरीत मृत बिबट्याचे पिल्लू पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांनी याबाबत पोलीस पाटील वारे यांना तात्काळ कळवले दिलीप वारे यांनी वन विभागाला घटनेची खबर दिली.
घटनेची माहिती समजताच भवानीनगर वनरक्षक दिपाली सागावकर व बावची वनरक्षक अमोल साठे यांनी वनकर्मचारी अंकुश खोत, विठ्ठल खोत, अनिल पाटील, विलास कदम व ग्रामस्थांच्या मदतीने मृत पिलाला बाहेर काढले. हे पिल्लू नर जातीचे असून, अंदाजे ३ महिने वयाचे आहे. इस्लामपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महारकर यांनी त्याचे शवविच्छेदन केले असून पाण्यात पडल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
या परिसरात ऊस शेती, झाडे व डोंगराळ भाग असल्यामुळे येथे बिबट्याचा वावर आहे. अस्वले यांच्या विहिरीला कठडे नाहीत. तसेच विरहीत उतरण्यासाठी पायऱ्या नाहीत. ‘पहाटेच्यावेळी बिबट्याची पिले एकमेकांबरोबर खेळताना अंदाज न आल्याने त्यातील एक पिल्लू विहिरीत पडले असावे,’ असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.वाळवा तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्या व त्यांच्या पिलांचे दर्शन वारंवार होत असून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे प्रमाण देखील वाढले आहे. गेल्या आठवड्यात येथूनच चार-पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वाटेगाव मधील ऊसात याच्यापेक्षा लहान पिल्लू व बिबट्या आढळून आले होते. तसेच याच परिसरात रात्री कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची चर्चा आहे.