होनगा येथे आज नवस फेडणे-बाळांचे नामकरण : यात्रोत्सवाची उद्या सांगता
वार्ताहर /काकती
होनगा येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांची भरयात्रा बुधवारी मोठय़ा उत्साहात पार पडली. सूर्योदयावेळी इंगळय़ांचा कार्यक्रम झाला. दिवसभरात हजारो भाविकांनी देवाचे दर्शन घेतले.
सोमवारी माघ पौर्णिमेच्या आदल्या दिवसापासून यात्रेला प्रारंभ झाला. देवस्थान पंच कमिटी, अध्यक्ष राजाराम पाटील हक्कदारी, मानकरी, ग्रामस्थ, भाविकांच्या उपस्थितीत देवाला नैवेद्य दाखविण्यात आला. मंगळवारी पौर्णिमेदिवशी दुपारी देवाचा सजविलेला गाडा मिरवणुकीने बेन्नाळी गावच्या भेटीला गेला. तेथून इंगळय़ांसाठी नाल्याजवळील परिसरातील लाकडे आणण्यात आली. सायंकाळी सात वाजता बलभीम गल्लीत सजविलेले देवाचे गाडे एकत्र जमले. मानाच्या देवाच्या गाडय़ाची पंच कमिटीच्यावतीने पूजा करण्यात आली. यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. प्रत्येक गल्लीत सुवासिनींनी आरती ओवाळून श्रीफळ वाढविले.
मिरवणुकीत सर्व समाजातील नागरिकांसह युवक मोठय़ा उत्साहात गुलालाची उधळण करीत सहभागी झाले होते. सजविलेल्या बैलजोडय़ा व गाडय़ांवर केलेली विद्युत रोषणाई यामुळे मिरवणूक आकर्षक ठरली. थोरामोठय़ांसह युवावर्गाने मोठी गर्दी केली होती.
पहाटे काळभैरवनाथ मंदिरासमोर मिरवणुकीची सांगता झाली. काकती पोलिसांनी यावेळी कडक बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी पहाटे देवाची पालखी व उत्सवमूर्तीची मिरवणुकीने नेताजी गल्लीतील ब्रह्मलिंग देवाची भेट घडवून आणली. तेथून राजाराम गल्लीतून ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील बाजूला बांधलेल्या पाळण्यात उत्सवमूर्ती घालून सुवासिनींसह जन्मोत्सव मोठय़ा थाटात साजरा करण्यात आला. तेथून पालखी सोहळय़ाचे प्रस्थान होऊन मंदिरात आगमन झाले.
बुधवारी सकाळी मंगल आरती झाली. सूर्योदयावेळी देवाला गाऱहाणे घालण्यात आले. धार्मिक विधी कार्यक्रम झाले. मंदिरासमोर रचलेल्या इंगळय़ांच्या लाकडांना अग्नी प्रज्वलित करण्यात आला. दिवसभर भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती.
विविध खेळणी व खाऊच्या दुकानांनी भैरवनाथ गल्ली व मंदिर परिसर सजला होता. भाविकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. गुरुवार दि. 17 रोजी नवस फेडणे, बाळांचे नामकरण होणार आहे. शुक्रवार दि. 18 रोजी यात्रा समाप्तीचे गाऱहाणे घालणे आदी धार्मिक विधी होणार आहेत.









