प्रतिनिधी/ पणजी
इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटीतर्फे नवी दिल्ली येथे नुकतीच एन प्लेन एअर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जागतिक स्तरावर 70हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. नॅशनल क्राफ्ट्स म्युझियम नवी दिल्ली आणि डीअर पार्क, हौज खास गाव नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत कालिदास सातार्डेकर यांच्या चित्राला पहिले पारितोषिक प्राप्त झाले. इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या प्लेन एअर वॉटर कलर प्रदर्शन आणि प्लेन एअर स्पर्धेत इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटी, इंडियाचे गोवा प्रमुख कालिदास सातार्डेकर यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा अमित कपूर आणि मेघा हांडा कपूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. कालिदास सातार्डेकर यांच्या एन प्लेन एअर वॉटर कलर पेटिंगचे नाव मांडोवी पॅलेट्स होते व सदर चित्र प्रदर्शनासाठी निवडण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांची 350 चित्रे निवडण्यात आली होती. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध कलाकार वासुदेव कामत यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर कामत यांनी मास्टर प्रात्यक्षिके दाखविली.
कालिदास सातार्डेकर यांच्याबरोबरच जागतिक स्तरावरील नामवंत कलाकारांना मास्टर प्रात्यक्षिकांकरिता आमंत्रित करण्यात आले होते. भारतातून वासुदेव कामथ, विलास कुलकर्णी, अमित कपूर, मेघा हांडा कपूर, श्रीतम सोना बॅनर्जी, मौमिता घोष, कांत राज, विवेक टेंबे, इराणमधून एल्हम हमीदी, ऑस्ट्रीयामधून इवाल्ड हिंटेरेगर यांना आमंत्रित करण्यात आले होते. याचबरोबर याठिकाणी 23वा जागतिक जलरंग दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभ झाला. कालिदास सातार्डेकर यांचे चित्र डीअर पार्क दिल्ली गॅलरी येथे प्रदर्शित करण्यात आले.
कालिदास सातार्डेकर यांच्या पेटिंगचे कौतुक केले. कालिदास सातार्डेकर यांनी सदर प्रात्यक्षिके 45 मिनिटांत पूर्ण केले. जे आव्हानात्मक होते.









